Sunday, 29 May 2016

हमाल


लहानपणी `त्याला` पहिल्यांदा पाहिलं ते पडद्यावर... कधी छोट्या तर कधी मोठ्या... कधी टीव्हीवरच्या चित्रपटात, तर कधी सार्वजनिक पूजेनिमित्त लावलेल्या स्क्रिनवर... `तो` `कुली` म्हणून समोर आला. त्या `कुली`पटात कुली झालेल्या अभिनेत्यावरचं चाहत्यांच्या प्रेमाच्या किश्शांचे संदर्भ काही लेखांत-पुस्तकांत वाचायला मिळाले. नंतर तो दिसला `हमाल`पटात. त्या अभिनेत्यानं `हमाल दे धम्माल` म्हणत केलेलं मनोरंजन अनेकांना आवडलं होतं. मग मात्र `तो` दिसला थेट `त्याच्या` `होमपीच`वर अर्थात रेल्वे स्टेशनवर. ओझी वाहताना... प्रवाशांच्या चेहऱ्यावर मग्रुरी आणि तुच्छतेचे भाव दिसूनही ते डोळ्यांआड करत मेहनतीनं पोटाची खळगी भरणारा. `त्याच्या` पुढच्या पिढीनं मात्र ते भाव नक्कीच टिपून ठेवले असणार मनात... मग त्यांनी एकवटली संघटना. थोडासा मुडपला असावा स्वतःचा स्वभाव आणि बदललं असावं स्वतःला. तिकडं प्रवाशांचीही पुढची पिढी होती एक पाऊल पुढं. व्हिलर बॅग्जचा वापर वाढला नि यांच्या पोटापाण्यावर थोडी गदा आली. `मी तो भारवाही`, असं प्रवाशानं म्हटल्यावर हमालानं काय करावं?... काहींनी शिक्षणाचा हात धरला तरी नोकरी सगळ्यांनाच थोडी मिळतेय?... मग व्हावं लागतं पुन्हा हमाल... उचलावी लागतात ओझी... प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष... अजूनही चाललाय प्रवास प्रवाशांसह `त्याचा`ही... `त्याच्या` प्रवासाला निरखण्याचा हा एक प्रयत्न... `त्याच्या` जिद्दीला केलेला छोटासा सलाम...


श्री हमालांची आरती

युगे अठ्ठावीस स्टेशनवरी उभा।
वामांगी ट्रॉली, दिसे दिव्य शोभा।
प्रवाशांचे भेटी परब्रम्ह आले गा।
हमाल वाहे भार सत्वरी सांगा।।१।।
जयदेव जयदेव जय हमाला।।
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा।।धृ।।
शेमला गळा कर ठेवूनि कटी।
कासे लेंगा/पॅण्ट शेंदूर लल्लाटी
टीसी प्रवासी नित्य येती भेटी।
गार्ड-ड्रायव्हर पुढे उभे राहती।।जय।।२।।
धन्य इंजिननाद स्टेशनक्षेत्रपाळा।
लाल डगले युनियन बिल्ले दंडा।
राई रखुमाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा हमाल सांवळा।।जय।।३।।
ओवाळूं आरत्या ओझिया येती।
फलाटावरती सोडूनिया देती।
ट्रंका बॅगा पोरे उचलती।
कष्टाचा महिमा वर्णावा किती।।जय।।४।।
एक्स्प्रेस-मेल प्रवासीजन येती।
चढउतार नित्य जे करती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
हमालांसी राधिका भावे ओवाळिती।
जय देव जय देव।।५।।



छायाचित्रं सौजन्य – विद्याधर राणे



Saturday, 14 May 2016

फॅमिली नंबर वन...

परवाच एका मैत्रिणीनं `एफबी`वर `फॅमिली फोटो` टाकला होता. त्या फोटोला चिक्कार `लाईक्स` मिळाले होते. त्या `फॅमिली`त आजेसासू-आजेसासरे, सासू-सासरे, जाऊ-दीर, पुतण्या-पुतणी, नवरा, मुलगी आणि ती स्वतः होती. आजच्या काळात एवढी `मोठी फॅमिली` नि तीही एकत्र नांदत्येय, म्हटल्यावर `लाईक्स` मिळणारच होते. त्याउलट दुसऱ्या मैत्रिणीच्या `इन्स्टा` `पिक`मध्ये नवरा, मुलगी आणि स्वतः ती होती. हीदेखील `फॅमिली`च आणि या `फॅमिली`चे डझनभर मित्र-मैत्रणी त्यांची `एक्सटेंडेड फॅमिली` म्हणून ओळखले जातायत... वाटलं की, असं असेल तर मग `कुटुंब` नि `एकत्र कुटुंब` या संकल्पना कशा मांडाव्यात? किंबहुना त्यांची काही चौकट आहे का नि नि असावी का?...

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील भावंडं एकाच घरात राहतात. गावगावांतून ही पद्धत अजूनही प्रचलित असली तरीही शहरी भागांतून ती हळूहळू नाहीशी होतेय. `मराठी विश्वकोशा`त कुटुंबाची व्याख्या `विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अगर अधिक स्त्रीपुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय`, अशी आहे. या कुटुंबांत निवासस्थान, स्वयंपाक, मालमत्ता, मिळकत-खर्च आणि सभासदांच्या एकमेकांबद्दलच्या जबाबदाऱ्या या गोष्टी बहुधा समाईक असतात. समाजातील नात्यागोत्याच्या व्यवस्थेचा एक घटक म्हणून असलेले कुटुंबाचं हे स्वरुप आणि लक्षणं मानवी समाजात आजवर अस्तित्वात असलेल्या कुटुंबसंस्थेवरून निश्चित होत गेली आहेत. `कुटुंब` हे एका व्यापक समाजरचनेचा घटक असून समाजातील इतर आर्थिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाशी तो संबंधित असतो.

`कुटुंबा`चा उगम निश्चित केव्हा नि कोणत्या अवस्थेत झाला याचा तर्क करणं कठीण आहे. आई-बाबा आणि मुलं यांचं रक्ताचं नातं व सामाजिक दुवे यांचा पूर्ण लोप असलेली समाजरचना इतिहासात कुठं आढळत नाही. कुटुंबाची अशी एखादी सहज आणि स्वतंत्र मानवी प्रेरणा अस्तित्वात नाही. पण सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कुटुंबाकडून होणाऱ्या कार्यांना समाजरचनेतच एक असाधारण स्थान आहे. यातच `संस्था` या दृष्टीनं `कुटुंबा`चं सामर्थ्य आहे. `कुटुंबपद्धती` ही मुख्यतः पितृसत्ताक, मातृसत्ताक होती. पुढं ती अर्थव्यवस्था, समाजव्यवस्थेवर आधारित नि आताची यंत्रप्रधान समाजव्यवस्थेवर आधारित आकारली.   
कुटुंब हा समाजातला महत्त्वाचा आणि आधारभूत गट आहे. त्यामुळं निर्माण होणारे भावबंध व्यापक समाजजीवनातही व्यक्त होतात. कुटुंबांतील व्यक्तींकडून होणाऱ्या संस्काराचा सदस्याच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. समाजमूल्यं, परंपरा, रितीभाती आणि आचारांचा वारसा संस्कारक्षम अवस्थेत आपल्याला कुटुंबाकडून मिळतो. `कुटुंब` संकल्पनेतली पुढची पायरी म्हणजे `एकत्र कुटुंब` आणि `विभक्त कुटुंब`. सामायिक रहिवास, सामायिक देवता, सामायिक भोजन आणि सामायिक मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची लक्षणं आहेत. रामायण-महाभारताच्या काळापासून हजारो वर्षं एकत्र कुटुंब संस्थेची पाळंमुळं आपल्या मातीत रुजलेली दिसतात. या व्यवस्थेत गृहव्यवस्थापन पद्धत, कुटुंबातील नियम-संस्कार आणि नात्यातील ओलाव्याला महत्त्व आहे.

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती हमखास दिसत असे. सुखी नि गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या कुटुंबातली सदस्यांचे नातेसंबंध, जिव्हाळा नि घरातलं आश्वस्त वातावरण घरात आलेल्याला आपलंसं करी. थोडीशी धूसपूस झाल्यावर लगेचच `वेगळं व्हायचंय मला`चा सूर आळवला जात नसे. आनंदात समरसणं आणि दुःखात एकमेकांचा आधार होणं, ही रित होती. नात्यांच्या विविध कंगोऱ्यांचा स्पर्श मुलांच्या जीवनास होत असे. त्यात अपरिहार्य असणारे प्रेम आणि प्रासंगिक संघर्ष सोसत मनं सक्षम होत असत. काही वेळा मात्र भांडणं विकोपास जाऊन झालेल्या जखमांचे घाव लवकर भरत नसत. पुढं जागा आणि आर्थिक कारणांमुळं एकत्र कुटुंबांचं विघटन होऊ लागलं. `शेती` हा `एकत्र कुटुंबा`तला एक मोलाचा दुवा कमकुवत होत गेला. नोकरी-व्यवसायास प्राधान्य मिळू लागलं. त्यास शिक्षण आणि आधुनिक ज्ञानाची जोड मिळाली. मात्र दुसरीकडं एकत्र कुटुंबांची चौकट केव्हाच ओलांडली गेली. माणसांतच नव्हे तर मनामनांतली अंतरं वाढल्यासारखी वाटली.
  
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात विभक्त कुटुंब व्यवस्था जोर धरत्येय. घरातल्या सदस्यांच्या सोईसाठी वेगळं व्हायचं कारण पुढं केलं जातंय. त्यामागं जबाबदाऱ्या कमी होऊन आर्थिक सुबत्ता यावी, अशीही काहींची भावना असू शकते. पण प्रत्यक्षात अनेकदा जबाबदाऱ्या नि तणाव वाढतातच. त्यातून बाहेर पडण्यासाठी टीव्ही, मोबाईल, सोशल साईटसची मदत घेतली जाते. हा टाईमपास हळूहळू सवय केव्हा होते, ते कळतही नाही. जग जवळ येत असलं तरीही नाती दुरावतात्येय का? पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागं लागताना `घर` मागं राहतंय का? पाठीवर पडणाऱ्या कौतुकाच्या थापेनं आणि मनातलं गूज एकमेकांना सांगण्यानं मोकळं वाटतं. हे पूर्वी एकत्र कुटुंबात मुलांच्या जडणघडणीच्या काळात घरातील सदस्यांकडून संस्कार करण्याच्या ओघात होई. दुर्दैवानं विभक्त कुटुंब पद्धतीमुळं काही कुटुंबांत मुलांच्या भावनांचा निचरा पटकन होत नाही. त्यामुळं एकाकीपणा वाढून मानसिक ताणतणाव निर्माण होतात. त्यातून काही गंभीर घटनाही घडू शकतात.

असं असलं तरीही विभक्त कुटुंबात राहणं म्हणजे काही गुन्हा नाही. ही कुटुंबही `कुटुंब`च असतात. या कुटुंबातील पतीपत्नी हे समाजाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादक आणि इतर व्यवहारांत अधिकाधिक सहभागी होतात. त्यामुळं पूर्वीप्रमाणं कुटुंबाची सत्ता आणि अधिकारीची स्थानं स्त्रीपुरुषभेदांनुसार ठळकपणं वेगळी आणि मर्यादित राहत नाहीत. दोघांनीही एकमेकांची कामं करावित, अशी अपेक्षा निर्माण होते. स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीपुरुषांतील समानता अपरिहार्य बनते. मुलांचं शिक्षण, वेळ, पैसा, करिअर आदी गोष्टींचं नियोजन केलं जातं. वेगळं झालं तरीही सगळ्या प्रसंगांत मुख्य घर आणि नातलगांकडं जाणं-येणं ठेवून संवादीपणा राखला चालतो. नेहमीच्या चौकटीबाहेर पाय ठेवल्यानं शेजार-पाजारी आणि फ्रेण्डसर्कल्सचे रेशमबंध तयार होतात. ही मंडळी `एक्सटेंडेड फॅमिली` म्हणून ओळखली जातात. ती हाकेसरशी धावून येतात. म्हणजे कुटुंब एकत्र नसलं तरीही माणसांचं भवताल नि सांघिक सहजीवन इथं आहेच.
            
`कालाय तस्मै नमः` म्हणत जुन्याचा मान नि नव्याचं स्वागत करणारी एकत्र कुटुंब कालौघात टिकलेली दिसतात. काही कुटुंबात तीन-चार पिढ्या एकत्र नांदताहेत. त्यांचं देवघर नि किचन सामाईक असतं आणि सगळे सदस्य एकदा तरी सहभोजनाचा आनंद घेतात. या कुटुंबांतल्या मुलांला आजी-आजोबा, काका-काकू आणि भावंडं आहेत. घरात सतत कुणीतरी असणं ही भावनाच या घरातल्या सदस्यांना मानसिकदृष्ट्या आधाराची वाटते. एकत्र सणसमारंभ साजरे करण्यातला आनंद त्यांना मिळतोय. घरातल्या सदस्यांनी केलेली अँडजस्टमेंट आणि एकमेकांशी सुसंवाद साधलाय. प्रत्येकाचं स्वातंत्र्य नि प्रायव्हसी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एकत्र बजेट ठरवल्यानं पैशांवरून वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
`काळाचा कॅलिडोस्कोप` पुन्हा थोडासा फिरलेला दिसतोय नि एकूणातच `कुटुंब` या संकल्पनेची महती थोडी वाढताना दिसत्येय. मायेची माणसं आपल्याजवळ हवीत ही जाणीव निर्माण होतेय. त्यामुळं कौटुंबिक धाग्यांची विण सहजपणं घट्ट होत्येय. घरात आवश्यक असणारा सुसंवाद, आदर, प्रेम-माया-जिव्हाळा, एकीची भावना अशा मूल्यांची जपणूक होत्येय. घरातल्या प्रत्येक सदस्याचं महत्त्व समान असतं. त्यामुळं प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी नि छंद जोपासता आले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबासोबत राहणं, कुटुंबाला एकत्र ठेवणं ही मानसिकता जपली गेली पाहिजे. एक `कुटुंब` ही एक प्रकारची उर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत आहे, मग ते कुटुंब एकत्र असो किंवा विभक्त. शेवटी घरातल्या माणसांवरच घराचं `घरपण` आणि सुख अवलंबून असतं, नाही का ? त्यामुळं आपण `कुटुंबा`त आहोत, हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का?...



(हीरकमहोत्सवी(६०) पोस्ट.)



(छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

Sunday, 1 May 2016

मोगरा

हलली ही वेल
जसा मनीचा सल
सळसळते चैतन्य
भाव हा अनन्य
व्रत तटस्थ आचरे
जमती गोजिरी पाखरे
अवचित नवल घडे
कळी मोगऱ्याची दिसे
पाकळी पाकळी गहन
गंधागंधांचे जीवन
जिवाशिवाचा हा खेळ
घाली मांगल्याचा मेळ
उत्स्फूर्त असे देणे
शुभ्र काही जीवघेणे...




(छायाचित्र - इंटरनेटवरून साभार.)