तोसे नैना जब से मिले...
``और अगला गाना पेश करते हैं, फिल्म `मिकी व्हायरस`से... जी हाँ, सही पहचाना दोस्तो! आवाज हैं अरिजित
सिंग की, और गाना हैं... तोसे नैना जब से मिले``... गाण्याची
सुरावट सुरू झाली नि जणू ट्रान्समध्येच जायला झालं... त्यातला एकेक `लब्ज` सही मायनें में लागू होत होता आयुष्याला...
त्यातल्या क्षणांना... सुरावटींची लय कमी होऊ लागली...
अरिजित गाऊ लागला...
इस लम्हें को रोक दूँ
या मैं खुद को इस में झोंक दूँ
क्या करू क्या करू क्या करू
इस लम्हें मैं कुछ भी जानू ना
नैना नैना लागे...
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिलें...
तोसे नैना जब से मिले...
हो रे, बाबा हो, अगदी शंभर काय, हज्जार टक्के खरंए हे... त्या
क्षणांना कसं काय रोखावं, स्वतःला कसं, काय, केव्हा सांभाळावं, काहीच म्हणून उमगत
नाही बॉsss. स्वतःला
त्या क्षणांमध्ये पूर्णपणं झोकून द्यावं का? की आणखी काही
करावं... काय करावं, काय करावं, काय करावं?... का सरळ हात
झटकून, असं म्हणावं, त्या क्षणांबद्दल मला बॉsss काहीच
माहिती नाहीये... पण असं तरी कसं म्हणता येईल?... कारण `तुला` पाहतानाच तर क्षणभरात सगळं घडलं... म्हणायला
झाली, फक्त नजरानजर... पण बस्सsss तितकं पुरेसं होतं...
तेवढ्यानंच पुढचा `अक्षर` सिलसिला
घडायला... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...
अरिजित पुढचं कडवं आळवू लागला...
ओ... सुद-बुद खोई हैं खोई मैंने
हाँ जान गवाई गवाई हैं मैंने
हाँ तुझ को बसाया धडकन में
ओ सावरें...
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिले``...
`तुला` पाहिल्यावर जणू भोवतालाचं भान हरपून जातं.
व्यावहारिक जगाचा विसर पडतो... काळ-वेळेचे निर्बंध आपसूकच विलग होऊन जातात...
खाण्यापिण्याची शुद्ध न उरण्याइतकं `तुझ्या`त रमायला होतं... वाटतंय की, `तूच` माझा बहिश्वर प्राण झालायस... माझ्या ध्यानी-मनी `तूच` वसलायस... माझ्या श्वासाश्वासात `तुझं` अस्तित्व जाणवतंय... तरीही `तुला` हाक मारायची धिटाई करतेय.. `ओ सावरे`... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...
अरिजितचं जादूभरं कडवं सुरू होतं...
खुद को खोकर तुझ को पाया,
इस तरह से मुझको जीना आया
तेरी लगन में सब हैं गवायाँ
इस तरह से मुझको जीना आया
तेरी हँसी मेरी खुशी
मेरी खुशी तू ही
तोसे नैना जब से मिले,
बन गये सिलसिले...
`तुला` मिळवण्याच्या नादात स्वतःलाच हरवून बसलेय... `तुला` मिळवण्याचा ध्यास घेतलाय... असंच काहीसं घडलं असावं...
काही का असेना पण निदान `तुझ्या`मुळं जगणं
तरी काही अंशी कळलंय... `तुझ्या`
भेटीच्या हुरहुरतेपोटी, `तुझा` हात
हाती घ्यायच्या आसेमुळं, आयुष्यातल्या असंख्य गोष्टी गमावून बसलेय... पण तरीही `तुला` पाहून होणारा आनंद... `तुझ्या`शी संवाद साधल्यानं मिळणारं समाधान... आणि `तुझ्या` अस्तित्वामुळं जगण्याच्या समष्टीचा हळूहळू उलगडणारा अर्थ... हे सारं
हवंहवंसं वाटणारं... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये
सिलसिले``...
खरंच, हा सिलसिला लहानपणीच सुरू झालेला... आपली पहिली भेट घडवली आजोबांनी...
तेव्हा हाती घेतलेला `तुझा` हात अद्याप सुटलेला
नाहीये... मग आपल्या घरच्यांनी (आपले नातलग, मित्रपरिवार, ग्रंथालयांतील कर्मचारी),
विविध ग्रंथदालनं, ब्लॉग्ज आणि अन्य `ई माध्यमां`तून `आपली` भेट सातत्यानं
घडतेय... आणि पुढंही घडत राहावी... राहिल... `तुझ्या` `अक्षर` जगात मला उलुशी पण
हक्काची जागा दिल्याबद्दल, अभिजात शब्दांचे संस्कार केल्याबद्दल, कल्पनेपासून
वास्तवाच्या जगात फिरण्याची संधी दिल्याबद्दल आणि `तूच` हे चार शब्द लिहिण्याची `शब्दशक्ती` दिलीस, त्या वरदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. एवढी वर्षं `तुला` वाचतेय, तरीही अजून अनंत
पुस्तकं वाचायची बाकी आहेतच... लिस्ट वाढता वाढे.... अर्थात त्यामागं आहे अपार
उत्सुकता, कुतुहल, `तुझ्या`बद्दलच्या
आपुलकीची साद... पुस्तका, मित्रा, सख्या,
सोबत्या... कोणत्या नि किती नावांनी हाक मारावी `तुला`... `तुला` आवडेल ते नाव निवड...
आणि हो, सगळयात महत्त्वाचं म्हणजे ज्या निमित्तानं हे सगळं व्यक्त केलंय, त्या २३
एप्रिल अर्थात `जागतिक पुस्तक दिना`च्या
हार्दिक शुभेच्छा...
... अरिजितचे सूर हळूहळू लय पावत होते... सुरावट मंदावत होती...
तरीही त्या शब्दांनी कायमचं पछाडलं होतंच... कारण, ``तोसे नैना जब से मिले, बन गये सिलसिले``...
*(प्रिय पुस्तकोबा, केवळ `तुझ्या`साठी, पंधरवड्याला ब्लॉग लिहिण्याचा हा
अपवाद.)*
(रेखाचित्र – इंटरनेटवरून साभार)