Sunday, 25 December 2016

कालाय तस्मै नमः

भिंतीवरचं बंद घड्याळ
भिंतीवरचं घड्याळ बंद
आत्ताआत्ता तर टिकटिकत होतं...
टोले देत वेळ सांगत होतं...
कोणती भिंत, कोणतं घड्याळ?
प्रश्न हवेच का सदासर्वकाळ?
एक भिंत, एक घड्याळ
सांगत आहे वेळ-काळ
घड्याळाचे तीन काटे
आहेत तसेच लहानमोठे
तास, मिनिट अन् सेकंद
काळातचं उमलतं जास्वंद
`कूर्म`गती, `ससा`गती, `फुलपाखरी` फिरणं
जणू जन्म, जगणं आणि मरणं
घड्याळाची तबकडी
आयुष्य कचकडी
घड्याळात दिसणारी वेळ?
त्रिकाळातला कोणता काळ?
काटे थांबलेत ते कधीचे?
सकाळ, दुपार की रात्रीचे?
कधी काढलेला फोटो
`काळ`कॅमेऱ्याचा मोड ऑटो
टोल कधीचा थांबलेला
काळानं थोडा पॉझ घेतलेला
वेळेच्या या नाजूक घड्याला
थोडंसं हलवा नि जरासं फिरवा
कदाचित होईल पुन्हा सुरू
सेकंदकाटा लागेल भिरभिरू
मिनिट काट्याचा मोठा तोरा
तास काट्याचा खरा ठरेल होरा
घड्याळ्याची तबकडी सचेतन
सुरू होईल काळाचं आंदोलन
पण किंवा मग कदाचित
घड्याळ पडून राहिल निपचित
काहीच नाही हालचाल
काट्यांचा सरला व्यापार
ना टिकटिक ना ठणाणा
नुरला `घड्याळा`चा बाणा
घड्याळाच्या विचारांत पुढं सरकतेय वेळ
पुन्हा एका नवीन वर्षाचा मांडलाय खेळ
खेळेल का आता घड्याळ?
दाखवेल का पुन्हा वेळ?
कोणता असेल तो काळ?
कोणती असेल ती वेळ?
कोणती असेल भिंत?
कुणाचं असेल घड्याळ?
पुन्हा पुन्हा सुटतील प्रश्नांचे बाण
उत्तरताना येतील कंठाशी घड्याळाचे प्राण
प्राण जावोत अथवा राहोत
चालू राहिल घड्याळाचं आवर्तन
कालाय तस्मै नमः कालाय तस्मै नमः


Sunday, 11 December 2016

माँटुकल्या ओंजळीतले क्षण...



परवा ग्रंथालयात गेले होते. आईनं वाचलेली ज्ञानेश्वरी परत करून नवीन पुस्तक आणायला. कोणतं घ्यावं... हा नेहमीचा यक्षप्रश्न चक्क टाळलाच आणि पुस्तकं बघायला सुरुवात केली... आणि हाती आलं एक पुस्तक... निळ्या-हिरव्या छटेतल्या मुखपृष्ठाचं... एक पिंटुकला पाण्यातल्या पिंपळपानाला निरखणारा... लेखकाचं नाव होतं संदेश कुलकर्णी. लगेचच घ्यायचं ठरवून पुस्तक नोंद करायला दिलं. नोंदणाऱ्यांनी पुसटसं स्मित केलं पुस्तकाचं नाव वाचून... कदाचित वाटलंही असेल त्यांना ज्ञानेश्वरीनंतर हे काय वाचणार... असो.

वाटेत पुस्तकाचेच विचार घोळत होते. `फेसबुक`वर या पुस्तकाविषयी बरंच ऐकलं-वाचलं होतंच. घरी आल्यावर कामामुळं पुस्तक लगेच वाचता नाहीच आलं. म्हणून जीव थोडा हिरमुसलाच. तरी ऋजुता घाटे यांनी काढलेल्या मुखपृष्ठावरची निळाई नि तो पिंटुकला जीवाला विसावा देत होतेच. थोडीशी सवड मिळाली तशी पुस्तकाकडं वळले नि वाचतच राहिले... पुस्तकभर पसरली होती ऋजुतांनीच काढलेली पिंटुकल्याची चित्र. मग पिंटुकल्यासोबत त्याच्या जगातले `माँटुकले दिवस` अनुभवले... त्या पिंटुकल्याचं खरं नाव `नील`. म्हटलं तर तो संदेशपेक्षा वयानं चिक्कार लहान. म्हटलं तर तो संदेशचा दोस्त. खरंतर प्रत्येक नात्याला काहीतरी लेबल लावलंच पाहिजे असंच नाहीच. हा पहिलाच धडा गिरवायला हवा आपण... तर `लेखक` संदेश आणि माँटू यांच्या अनुभवविश्वात आपलाही शिरकाव इतक्या सहज नि अल्लदपणं होतो की, एखादा मनोवेधी लघुपट असावा, तसं हे पुस्तक आपण वाचतो किंवा ऐकतो-बघतोदेखील... त्यातल्या आवाज-संवादांसह... कारण माँटूच्या `हसऱ्या चेहऱ्या`च्या निमित्तानं आपल्याला कळतंच की, हसू जितकं वापराल तितकं अधिकच खुलायला लागतं...  

माँटूच्या कमालीच्या कल्पकतेनं निर्माण केलेल्या `नव्या खिडकी`तून त्याच्यासोबत आपणही चिक्कार फिरतो. वासरू, माकडं असं काहीबाही पाहातो. अशी एक खिडकी आपल्यालाही गवसायला हवी... असं मनातल्या मनात घोकत, त्या खिडकीच्या शोधात असतानाच आपण माँटूसारखे सदय होत आपल्या जिवलगांशी आध्याअधुऱ्या राहिलेल्या गप्पा पुन्हा रंगवायचा निश्चय मनोमन करून टाकतो. माँटू कधी स्वतः देव होतो, कधी संदेशला देव व्हायला सांगतो. त्याप्रसंगावरची ``दुसऱ्यामध्ये देव बघणं आणि स्वतः देव होणं अगदीच सोप्पं होतं.`` ही टिप्पणीच बोलकी आहे. कधी एका पात्रातून दुसऱ्या पात्राचा जन्म होणं, कधी समजदारपणं वागणं, कधी कंटाळा नि कुतुहल वाटणं तर निरागसपणं प्रश्न विचारणं हे सारं माँटू करत राहातो. कधी शाब्बासकीची थाप तर कधी अबोध भीतीनं मनात केलेलं घर... कधी मोठ्यांसारखी घरच्यांची काळजी घेणं तर स्वतःसाठी जागा शोधून काढणं हे सारं वेगवेगळ्या घटनांतून दिसतं. काही काळ चालणारा यशोदा-कृष्ण किंवा देव-राक्षसांच्या माँटूच्या खेळांत अँनिमेटेड मालिकांचं प्रतिबिंब आपसूकच उमटलेलं दिसतं.

या दोघांमध्ये एक दिवस अवचितपणं उगवतात आणखीन दोघीजणी. माँटूच्या `फ्रेण्डस्`. सिद्धी आणि सिद्रा. मग या चौकडीतल्या ताण्याबाण्यांचा, त्यांच्या हसण्या-रुसण्याच्या, खेळण्या-खिदळण्याच्या आणि त्यांची मैत्री अधिक दृढ होण्याच्या वेगवान घटनांमध्ये आपणही गुंतून जातो. आणि उजाडतो माँटूचा वाढदिवस... त्याचं `मोठं होणं` त्याच्या वागण्याबोलण्यातून प्रतीत होणं वाचता वाचता आपसूकच एका वाक्याशी थबकतोच... माँटू म्हणत असतो की, ``संदेश, तुम्हारी आँखोंमें मैं खुदको देख सकता हूँ...`` रूला दिया ना यार तुने...

एका बैठकीत वाचून नव्हे, अनुभवलेल्या माँटूचं पुस्तक व्यावहारिकदृष्ट्या वाचून संपलेलं असतं खरं... पण माँटू अजूनही मनाच्या गावात वस्तीला आहेच... माधुरीताई पुरंदरे यांच्या मलपृष्ठावरील अभिप्राय वाचल्यावर माँटूनं कायमची वस्ती करावी, असंही काहीबाही वाटून राहिलंय... मोठं होण्याच्या नादात हरवलेलं किंबहुना आपल्या हातून अनेकदा निसटून गेलेलं एक भारी जग... तिथं कल्पना नि वास्तवाची होते सरमिसळ... तिथं सहजच असते `अनेकता में एकता`, तिथं असतो सहद्यपणा आणि तिथं वसतं आपल्या प्रत्येकात दडलेलं `मूलपण`... नि अर्थात `माणूसपणसुद्धा`... हे सगळं जाणवण्यासाठी लागते ती संवेदनशीलता आणि उर्जादेखील... ही संवेदनशीलता नि उर्जा आपण मिळवायला हवी. बहुतांशी स्वतःची स्वतः आणि कदाचित आपल्याही भोवतालच्या माँटूंकडूनही ती मिळेल... कदाचित... या कदाचितचं उत्तर प्रत्येकानं शोधावंच... ते मिळवताना `मॉंटुकल्या ओंजळीतले क्षण` जपायला हवेत हे मात्र नक्की...

(साभार : मॉंटुकले दिवस – संदेश कुलकर्णी. मनोविकास प्रकाशन. माहीम सार्वजनिक वाचनालय).

माझ्या ब्लॉगची अमृतमहोत्सवी (७५) पोस्ट.

Sunday, 27 November 2016

आपण सारे `लोला`

`फ्रेम`मध्ये `ती` धावतेय... अखंडपणं... जीव मुठीत घेऊन... बंधनं तोडून... धावतेय `ती`... `ती` धावली... एक घटना घडली... एक शक्यता संपली...
पुन्हा फ्रेममध्ये `ती` आली. दुसऱ्यांदा `ती` धावताना दिसतेय. `ती` धावतेय... अखंडपणं... जीव मुठीत घेऊन... बंधनं तोडून... धावतेय `ती`... `ती` धावली... एक घटना घडली... दुसरी शक्यता संपली...
पुन्हा फ्रेममध्ये `ती` आली. दुसऱ्यांदा `ती` धावताना दिसतेय. `ती` धावतेय... अखंडपणं... जीव मुठीत घेऊन... बंधनं तोडून... धावतेय `ती`... `ती` धावली... एक घटना घडली... तिसरी शक्यता संपली...
कदाचित शक्य असतं तर आणखीही काही शक्यता दाखवल्या गेल्या असत्या... पण शेवटी चित्रपट म्हटल्यावर त्याला त्या माध्यमाच्या आणि वेळेच्या मर्यादा येणारच. चित्रपट संपला खरा, पण डोक्यात शिल्लकीत राहिली आहेत `ती` तिची धावणारी पावलं... त्यांना प्रत्येक वेळी घडणाऱ्या शक्यतेमुळं मिळणारी एकेक दिशा... त्या पावलांचा त्या त्या दिशेचा प्रवास... किंवा असंही म्हणता येईल की, आयुष्यातल्या शक्यतांचा चित्रपटातल्या अवकाशातला कॅलिडोस्कोपच जणू... ते धावणं डोक्यात इतकं भिनू लागतं की, आपण अनेकदा तिच्याजागी स्वतःला कल्पू लागतो. सतत धावणारे... आज हे, उद्या ते, परवा अमूक नि एरवा तमूक... अनेकदा ही धाव असते आपल्या परीघापुरती. बऱ्याचदा त्याच त्या वर्तुळात फिरायचा किंबहुना धावायचा प्रयत्न करणारी... `आपली धाव`...

`आपल्या धावे`त अनेकदा आपण वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये शिरतो. कधी होतो `ससा` किंवा कधी होतो `कासव`... त्यांच्या गोष्टीविषयी एकदा लिहायचं आहे... कधी होतो `गोगलगाय` किंवा कधी होतो `ससाणा`... कधी `अबलख घोडा` तर कधी `अस्वल्या`... कधी होतो आपण `मोगली`... कधी आपल्याला `बघिरा` भेटतो तर कधी `शेरखान` पुढ्यात उभा ठाकतो... त्या त्या वेळी जाणवलेली शक्यता चाचपडली जाते. त्या त्या वेळी तसं तसं धावलं जातं. त्या धावेत कधी पहिले येतो, कधी दुसरे. कधी शेवटू नंबर लागतो आपला तर कधी सपशेल होते हार...

खरंतर हारजीत यातलं काहीही झालं तरी धावावं हे लागतंच... `लोला`सारखं... त्या त्या शक्यतांचं धुकं लवकर विरतं... कधी त्या शक्यतांच्या चक्रव्यूहात आपला `अभिमन्यू` होतो... अशा वेळी लागतो आपसूक एक ब्रेक... अगदी कचकचून... पुन्हा धावायचं की `जैसे थे` थांबून राहायचं, हे सर्वस्वी अवलंबून असतं त्या त्या क्षणांवर... कॅरेक्टर कोणतंही असलं, तरी धावणं ही गोष्ट असतेच अपरिहार्य... शेवटच्या श्वासापर्यंत... अगदी त्या `रन लोला रन` चित्रपटातल्या `लोला`सारखं... कारण असतो आपण सारेच `लोला`...






रेखाचित्र – इंटरनेटवरून साभार.

Saturday, 12 November 2016

अजून फुलपाखरू भिरभरतं...

आठवतोय मध्यंतरी एक लेख पोस्टला होता, `क्षण एक पुरे` या शीर्षकाचा. ``एकदा काय झालं, एक फुलपाखरू उडत उडत आलं नि एका फुलावर बसलं. तितक्यात तिकडून आला...`` ही होती त्या लेखाची पंचलाईन. तेव्हा मी म्हटलं होतं, त्यानुसार ही एक कल्पना भिरभिरतेय... किंवा शक्यता म्हणा हवं तर...

``एकदा काय झालं, एक फुलपाखरू उडत उडत आलं नि एका फुलावर बसलं. तितक्यात तिकडून आला...``

या तेव्हाच्या पंचलाईनच्या भोवतालच्या फुलपाखराचं हे विहारणं...

एका कोषात, निराळ्याच जगात. इवलंसं फुलपाखरू, लागे कल्पना साकारू. भावनांचं विश्व, मनोरथांचे अश्व. एकेक धागा सलग, होऊ लागला अलग. पंखांत आलं बळ, आता आकाश मोकळं. भिरभिर भिरभिर, फुलांवर फिर फिर. रंगांची पखरण, नक्षीचं रेखाटन. क्षणाक्षणांची मोजणी, आयुष्याची आखणी. शिकवून जाई धडा, भरे अनुभवांचा घडा. अनुभवावी सारी किमया, निसर्गाची अनोखी माया...

खरंच या `फुलपाखरा`चं करावं काय? कारण अजूनही `कल्पना`... `या फुलपाखराचं काय करायचं`?, हा प्रश्न `जैसे थेच...` आपल्याभोवतालच्या अनेक प्रश्नांसारखा... रोजच्या जगण्याशी निगडित गोष्टींसारखा. आज हा, तर उद्या तो... प्रश्नांची लिंक काही संपत नाही... कधीतरी, काहीतरी, कुणीतरी, आम्ही, तुम्ही करायला हवं, `या फुलपाखराचं...` `फुलपाखरासाठी फुलं अस्तित्वात आहेत,` तोपर्यंत सुचेलही कदाचित पुढल्या कोणत्यातरी लेखात... `तो एक क्षण पुरे, क्लिक होण्यासाठी. किंवा आतासारखा व्हिडिओतल्या `फुलपाखरी क्षणां`त बंदिस्त होण्यासाठी...` भवतालाच्या आवाजी पार्श्वभूमीसह...

तोपर्यंत `कल्पने`चे पंख फडफडत राहणार... `फुलपाखरा`च्या अनाहत उडण्याइतकेच...



  



व्हिडिओ संकलन - राधिका कुंटे. 

Sunday, 30 October 2016

फाssssस्ट फॉरवर्डsss


किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
घड्याळाचे काटे मागं पडले
मोबाईल सेकंद खुणावू लागले
शेअरिंगसाठी व्हॉटस् अँप की फेसबुक
खरेदीसाठी लाईफस्टाईल की मॅक्स
घरबसल्या ऑनलाईनचा ऑप्शन
झटकन घ्यायचा ओन डिसिजन
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
नाटकं पाहात थिल्लर
सांस्कृतिक भूक होते चिल्लर
जुनं ते सोनं उकरून
रिमिक्स गीतं आळवून
फ्युजन फूड खातखात
चवीशी करत दोन हात
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
तोंडी लावायला पर्यावरणाचा प्रश्न
केवळ भंपक कॉपी-पेस्टचं सत्र
जगणंच सगळं तऱ्हेवाईक
जणू एकेक बाहुले तांत्रिक
आपल्यावर बेतल्यावर होतो शहाणे
तोवर निरर्थक होते जगणे
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
पुस्तकांच्या अक्षर जगात
`किंडल`चे वारे, `ईबुक्स`चे तारे
झाकोळला सूर्य `वाचना`चा  
कॉपीराईट वादाचा मुद्दा
संमेलनांचा वाढता पसारा
भाषेची गळचेपी आवरा
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
महिनाभर अखंड झुंजायचं
`पगारवून` पवित्र व्हायचं
बिलं चुकती करत
लोनवर लोन काढत
सुखसोयीयुक्त आयुष्य
यंत्राधीनतेचं इंद्रधनुष्य
किती नि कुठवर धावायचं?
किती धरायचा कामाचा हेका
आपसूकच धरतो ताणाचा ठेका
नात्यांच्या रेशीमगाठी गुंतवायच्या की सोडवायच्या
`स्पेस`चा फंडा कसा किती अवलंबायचा
आपल्या मागची काळजी
आपल्या पुढची काळजी
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?
रोजरोजची चिंतन बैठक
डोका गया अपना सटक
छोड दो ये पागलपन
चल जरा `शाणा` बन
ते कसं काय व्हायचं?
`नेटसर्च` करून मोकळं व्हायचं
किती नि कुठवर धावायचं?
नेमकं कसं काय जगायचं?

 

 छायाचित्रं - राधिका कुंटे.