माँटुकल्या ओंजळीतले
क्षण...
परवा ग्रंथालयात गेले होते. आईनं वाचलेली
ज्ञानेश्वरी परत करून नवीन पुस्तक आणायला. कोणतं घ्यावं... हा नेहमीचा यक्षप्रश्न
चक्क टाळलाच आणि पुस्तकं बघायला सुरुवात केली... आणि हाती आलं एक पुस्तक...
निळ्या-हिरव्या छटेतल्या मुखपृष्ठाचं... एक पिंटुकला पाण्यातल्या पिंपळपानाला निरखणारा...
लेखकाचं नाव होतं संदेश कुलकर्णी. लगेचच घ्यायचं ठरवून पुस्तक नोंद करायला दिलं.
नोंदणाऱ्यांनी पुसटसं स्मित केलं पुस्तकाचं नाव वाचून... कदाचित वाटलंही असेल
त्यांना ज्ञानेश्वरीनंतर हे काय वाचणार... असो.
वाटेत पुस्तकाचेच विचार घोळत होते. `फेसबुक`वर या पुस्तकाविषयी
बरंच ऐकलं-वाचलं होतंच. घरी आल्यावर कामामुळं पुस्तक लगेच वाचता नाहीच आलं. म्हणून
जीव थोडा हिरमुसलाच. तरी ऋजुता घाटे यांनी काढलेल्या मुखपृष्ठावरची निळाई नि तो
पिंटुकला जीवाला विसावा देत होतेच. थोडीशी सवड मिळाली तशी पुस्तकाकडं वळले नि
वाचतच राहिले... पुस्तकभर पसरली होती ऋजुतांनीच काढलेली पिंटुकल्याची चित्र. मग पिंटुकल्यासोबत
त्याच्या जगातले `माँटुकले दिवस`
अनुभवले... त्या पिंटुकल्याचं खरं नाव `नील`. म्हटलं तर तो संदेशपेक्षा वयानं चिक्कार लहान.
म्हटलं तर तो संदेशचा दोस्त. खरंतर प्रत्येक नात्याला काहीतरी लेबल लावलंच पाहिजे
असंच नाहीच. हा पहिलाच धडा गिरवायला हवा आपण... तर `लेखक` संदेश आणि माँटू यांच्या अनुभवविश्वात आपलाही
शिरकाव इतक्या सहज नि अल्लदपणं होतो की, एखादा मनोवेधी लघुपट असावा, तसं हे पुस्तक
आपण वाचतो किंवा ऐकतो-बघतोदेखील... त्यातल्या आवाज-संवादांसह... कारण माँटूच्या `हसऱ्या चेहऱ्या`च्या
निमित्तानं आपल्याला कळतंच की, हसू जितकं वापराल तितकं अधिकच खुलायला लागतं...
माँटूच्या कमालीच्या कल्पकतेनं निर्माण केलेल्या `नव्या खिडकी`तून त्याच्यासोबत
आपणही चिक्कार फिरतो. वासरू, माकडं असं काहीबाही पाहातो. अशी एक खिडकी आपल्यालाही
गवसायला हवी... असं मनातल्या मनात घोकत, त्या खिडकीच्या शोधात असतानाच आपण
माँटूसारखे सदय होत आपल्या जिवलगांशी आध्याअधुऱ्या राहिलेल्या गप्पा पुन्हा
रंगवायचा निश्चय मनोमन करून टाकतो. माँटू कधी स्वतः देव होतो, कधी संदेशला देव
व्हायला सांगतो. त्याप्रसंगावरची ``दुसऱ्यामध्ये देव
बघणं आणि स्वतः देव होणं अगदीच सोप्पं होतं.`` ही टिप्पणीच बोलकी
आहे. कधी एका पात्रातून दुसऱ्या पात्राचा जन्म होणं, कधी समजदारपणं वागणं, कधी
कंटाळा नि कुतुहल वाटणं तर निरागसपणं प्रश्न विचारणं हे सारं माँटू करत राहातो.
कधी शाब्बासकीची थाप तर कधी अबोध भीतीनं मनात केलेलं घर... कधी मोठ्यांसारखी
घरच्यांची काळजी घेणं तर स्वतःसाठी जागा शोधून काढणं हे सारं वेगवेगळ्या घटनांतून
दिसतं. काही काळ चालणारा यशोदा-कृष्ण किंवा देव-राक्षसांच्या माँटूच्या खेळांत
अँनिमेटेड मालिकांचं प्रतिबिंब आपसूकच उमटलेलं दिसतं.
या दोघांमध्ये एक दिवस अवचितपणं उगवतात आणखीन
दोघीजणी. माँटूच्या `फ्रेण्डस्`. सिद्धी आणि
सिद्रा. मग या चौकडीतल्या ताण्याबाण्यांचा, त्यांच्या हसण्या-रुसण्याच्या,
खेळण्या-खिदळण्याच्या आणि त्यांची मैत्री अधिक दृढ होण्याच्या वेगवान घटनांमध्ये आपणही
गुंतून जातो. आणि उजाडतो माँटूचा वाढदिवस... त्याचं `मोठं होणं` त्याच्या
वागण्याबोलण्यातून प्रतीत होणं वाचता वाचता आपसूकच एका वाक्याशी थबकतोच... माँटू
म्हणत असतो की, ``संदेश, तुम्हारी आँखोंमें मैं खुदको देख सकता
हूँ...`` रूला दिया ना यार तुने...
एका बैठकीत वाचून नव्हे, अनुभवलेल्या माँटूचं
पुस्तक व्यावहारिकदृष्ट्या वाचून संपलेलं असतं खरं... पण माँटू अजूनही मनाच्या
गावात वस्तीला आहेच... माधुरीताई पुरंदरे यांच्या मलपृष्ठावरील अभिप्राय वाचल्यावर
माँटूनं कायमची वस्ती करावी, असंही काहीबाही वाटून राहिलंय... मोठं होण्याच्या
नादात हरवलेलं किंबहुना आपल्या हातून अनेकदा निसटून गेलेलं एक भारी जग... तिथं
कल्पना नि वास्तवाची होते सरमिसळ... तिथं सहजच असते `अनेकता में एकता`, तिथं
असतो सहद्यपणा आणि तिथं वसतं आपल्या प्रत्येकात दडलेलं `मूलपण`... नि अर्थात `माणूसपणसुद्धा`... हे
सगळं जाणवण्यासाठी लागते ती संवेदनशीलता आणि उर्जादेखील... ही संवेदनशीलता नि उर्जा
आपण मिळवायला हवी. बहुतांशी स्वतःची स्वतः आणि कदाचित आपल्याही भोवतालच्या माँटूंकडूनही
ती मिळेल... कदाचित... या कदाचितचं उत्तर प्रत्येकानं शोधावंच... ते मिळवताना `मॉंटुकल्या ओंजळीतले क्षण` जपायला हवेत हे मात्र नक्की...
(साभार : मॉंटुकले दिवस – संदेश कुलकर्णी. मनोविकास प्रकाशन. माहीम
सार्वजनिक वाचनालय).
माझ्या ब्लॉगची अमृतमहोत्सवी
(७५) पोस्ट.
No comments:
Post a Comment