Sunday, 29 November 2015

शब्द


शब्द... शब्द असतात कायमच आपल्या साथीला. आपल्या भावना व्यक्त करणारे. अडीनडीला धावून जाणारे. आपल्यासोबत सावलीसारखे सतत राहणारे. ते फक्त `आपले` असतात. म्हटलं तर आपापल्या प्रत्येकाचेच आणि तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचेच. कुणीशी त्यांची दोस्ती आणखी गहिरी होते... अधिकच जानपहचान होते. मग त्यांची नि आपली रंगतात ती गप्पाष्टकं... शब्द... लिखित माध्यमं नि साहित्यिक पुस्तकांसह इतर कितीतरी सजीव-निर्जीव माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहचतात... होते आपली गळाभेट... या मनीचे त्या मनी निःशब्दपणं अलगदपणं पोहचतं... त्यातून पुन्हा आकारतात शब्दच...


शब्द

शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
सणसणीत
खणखणीत
सडेतोड
भांडाफोड
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
गुळमुळीत
सुळसुळीत
गोडगोड
लिंबाची फोड
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
कांगावाखोर
हेकेखोर
चिडीचे
रडीचे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
पेटणारे
विझवणारे
शहारणारे
बिथरवणारे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
फसफसणारे
बुडबुडणारे
ओथंबणारे
ओरबाडणारे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
खरे-खरे
खोटे-खोटे
चांगले-चुंगले
वाईट-साईट
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
अक्षरांचा बाजार
बाराखडीचा व्यापार
पांढऱ्यावर काळे
काळ्य़ावर पांढरे
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
लवकर लावा बोली
नाहीतर मारा फुली
मनातल्या विचारांवर
स्वतःतल्या माणसावर
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?
संपला कोटा
जमल्या नोटा
मन मात्र उपाशी
कशी जिरली खाशी
शब्द घ्या शब्द...
देणार किती अब्ज ?

 

Sunday, 22 November 2015

फिरत्या चाकावरती...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांचे आवाजही चिडीचूप झालेले... म्हणून त्यांच्या रुममध्ये डोकावले... तर भाच्या स्मार्टफोनवर तल्लीन झालेल्या... एकीच्या त्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती नि दुसरी तितक्याच तन्मयतेनं स्क्रिनवरच्या घडामोडी निरखत असावी. म्हणजे असं मला वाटलं बॉ... मी आल्या पावली परत फिरणार तो भाचेरावही तिथंच येऊन धडकले. डायरेक्ट फोनमध्येच डोकं नव्हे नाक खुपसते झाले... स्क्रिनवर चटाचटा फिरणारी बोटं थबकली. सेकंदाभरानं सहाही डोळे माझ्याच दिशेनं वळले. पाठोपाठ उत्तर येऊन थडकलं ``पॉटरी करतेय ग...`` माझा प्रश्नार्थक चेहरा त्याच्या पुढल्या सेकंदात वाचून (``हे अजाण बालिके,`` असे कीवचे भाव चेहऱ्यावर आणून) भाची म्हणाली, ``हे एक अँप आहे ग. तुला हवंय का... शेअर इट सुरू कर. देते.`` तिच्या या बोलांनी धन्य धन्य वाटून घेत मी आधी त्या अँपची सखोल चौकशी केली (की स्वतः अज्ञान त्यांच्यापुढं उघड केलं) की, बॉ, ते ऑफलाईनही खेळता येतं का, अमूक का नि तमूक का वगैरे वगैरे... त्या चौकशीसत्राला कंटाळून तिनं थेट अँप सुरू करून प्रात्यक्षिकच दाखवायला सुरूवात केली...

``हे बघ, इति भाची म्हणाली, हे आहे पॉटरी अँप. ते सुरू झाल्यावर येतात तीन ऑप्शन्स. क्रिएट. शॉप. इनबॉक्स. त्यात क्रिएट सिलेक्ट करायचं. समोर येतं ते फिरतं चाक नि होऊ घातलेल्या सुबक मातीच्या भांड्याचा किंवा मडक्याचा बेसिक आधार. तो आपल्या मनासारखा घडवला की येतो ऑप्शन फायरिंगचा. पुढं जस्ट टिक करायचं. फायर प्रोसेस रेडी झाली की मग येतातय कलर्स, ब्रशेशचे ऑप्शन्स. त्यासाठी आधी थोडी कमाई करायला लागते व्हर्च्युअली. ती केल्यावर शॉपमधून हे साहित्य घेता येतं. मडकं रंगवून झालं की पुन्हा रेडीची टीक टच करायची. मग येतो सेलचा ऑप्शन. तो टच केल्यावर मडकं होतं सोल्ड नि मिळते त्याची किंमत. ती वेळोवेळी तुझ्या खात्यात जमा होते नि त्यातून शॉपिंग करता येतं, रंगकामाच्या साहित्यासाठी... बघ हवंय का हे तुला?`` भाचेराव आणि मी एकदमच होकार दिला. मग `शेअर इट` अँप डाऊनलोड केल्यावर `पॉटरी अँप`ही मोबाईलवर अवतरलं एकदाचं. पर एक बात तो हो गई जनाब... मोबाईल थे दो और पॉटरी के चाहनेवाले थे चार... बहुत नाइन्साफी हैं भाय... असा डायलॉग न मारता आम्ही आलटून पालटून मोबाईल शेअर करायचं ठरवलं... आपसूकच एक क्रिएटव्ह कॉम्पिटिशन सुरू झाली. कोणाचं मातीकाम सरस होतंय याची... मारधाड आणि निव्वळ टाईमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या मोबाईलवरच्या गेम्सपेक्षा हे काहीतरी भारी गवसलं होतं...  
आयड्रिम्सनं डेव्हलप केलेल्या या अँपमागचा विचार आणि त्यांची कल्पनाशक्ती सॉलिड वाटली. भिंग घेऊन मातीचा नमुना शोधायला लागण्याच्या नि मुलांना चिखल-मातीत खेळायला बिल्कुल मनाई केली जाण्याच्या काळात हे व्हर्च्युअल मातीकामाचं जग घडवणं सोप्पं काम नव्हतं. म्हणूनच कदाचित मुलांना खिळवण्यासाठी त्यात व्हर्च्युअल पॉइंटचं अमीष ठेवलेलं असावं. ते फिरतं चाक, त्यावर घडत जाणारा तो घडा किंवा मडकं... त्याला हवा तो आकार देताना नि रंगवताना आपल्या कल्पनाशक्तीला मिळणारी चालना, मातीकाम करताना भोवताली निसर्ग असल्याचा फिल देणारे पक्ष्यांचे ते सुखावह आवाज, घडा पूर्ण झाल्यावर फायरिंग होताना भट्टीचा फिल देणारे रंग नि आवाज, घडा विकणं, विकताना येणारे कुजबुजत्या चर्चेचे आणि अखेरीस विक्री पूर्ण होऊन पॉइंटस् मिळाल्यावर होणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट... तो सारा `फिल` थोडक्या वेळेसाठी बाकीच्या जगाचा विसर पाडणारा असतो. खरोखरची कलासाधना तरी यापेक्षा काही वेगळी असते का... कोणत्याही कलाप्रकारात स्वतःला झोकून देत त्या कलेच्या परिपूर्णतेसाठी, त्यात अव्वल ठरण्यासाठी करावे लागणारे परिश्रम, त्यातून तालावून-सुलाखून बाहेर पडणं, त्या कलेबद्दल स्तुतीच्या चांदण्यात न्हाऊन निघणं किंवा टीकेच्या झगझगीत उन्हाचा सामना करावा लागणं आणि त्यानंतरच्या कलाकृती करताना या सगळ्याच्या पलीकडं जाऊन कलाकर कलेशी एकतान पावणं नि त्यात त्याला स्वतःचाही विसर पडणं... या सगळ्या गोष्टी येतातच नाही का... ``अग, लक्ष कुठंए तुझं... आता माझी टर्न आहे...`` भाचेराव गरजले... मोबाईल निमूटपणं त्याच्या हातात दिला...

दिवाळीच्या सुट्टीतली लांबलचक टळटळीत दुपार... खिडकीसमोरच्या एकुलत्या एक शिल्लक राहिलेल्या झाडावर कर्कश्शणारा कावळोबा... उन्हाच्या तलाखीनं हैराण झालेली आळसटलेपणानं अस्ताव्यस्त घरभर पसरलेली निरव शांतता... भाचवंडांच्या झपाझप चालणाऱ्या बोटांनाही लय आली होती... व्हर्च्युअल मातीकाम आकारत होतं... शेजारच्या घरातल्या रेडिओतून गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत-सूर कानावर आले... ``फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार! माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार! घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्याविना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडिसी. न कळे यातून काय जोडिसी? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार!...``



Sunday, 15 November 2015

दहशत...

जन्माला येते दहशत
करते सारी वाताहत
रक्ताचा थेंब नि थेंब
आशेचा नसतो कोंब
रक्ताळलेले चेहरे
राजकारणी मोहरे
सापशिडीचा खेळ
निघून जातो वेळ
जनतेची होई दुर्दशा
दहशतीतही असे का नशा?
सरणार कधी हे रण?
येणार कधी तो क्षण?
शांततेचा समाधानाचा...
सलोख्याचा, निवांततेचा...
की पुन्हा अवतरतील कृष्ण–बुध्द
थांबवण्यास अमानुषतेचं युध्द...

छायाचित्र – राधिका कुंटे.


Sunday, 8 November 2015

दिवाळी... दिवाळी...

पणती, वात, प्रकाश... अंधाराला भेदणारं अवकाश...
दिव्यांच्या माळांची लुकलुक... हेलकावणारा आकाशकंदिल...
रंग, रांगोळी, आकार... सृजनाचा आविष्कार...
शुभेच्छांचा भडिमार... व्हर्च्युअली शानदार...
खुसखुशीत, खमंग... कुरकुरीत, गोडधोड...
भरलेलं फराळाचं ताट... पंचपक्वान्नांचं थाट...
अत्तरं, परफ्युम्सचा शिडकावा, सुवासाचा ओनामा...
चकचकाट, लखलखाट... गिफ्टस् भरमसाठ...
अभिजात, झळाळता, नेत्रदीपक... हरएक दृष्टितला फरक...
तलम, रेशमी, लडीदार... सुळसुळीत, झगझगीत, भारंभार...
मिळे बोनस अचानक... खरेदी मोठी खर्चिक...
ऑनलाईन मार्केटिंगची बूम... घरोघरची धामधूम...
धावपळीच्या डिजिटल युगात... काही घटका निवांत...
आनंद, उत्साह, व्दिगुणित... मन भरे काठोकाठ...
चार दिवसांचा सण... नात्यांचा आलेख...
नव्या-जुन्याची सांगड... कोलाजतेय सुरेख...



(छायाचित्र – इंटरनेटवरून साभार)






Sunday, 1 November 2015

फ्रेम

फ्रेम... क्षणाक्षणांची... अनादी, अनंत, अनाहत...
फ्रेम... काळाकाळाची... भूत, वर्तमान, भविष्य...
फ्रेम... आयुष्याची... जन्म, जीवन, मरण...
फ्रेम... चौकटीची... अल्याड, आत, पल्याड...
फ्रेम... अमूर्ताची... रेघोट्या, रेषा, रेखाटन...
फ्रेम... मूर्ताची... रंग, रुप, रस...
फ्रेम... फोटोंची... क्षण, पकडणं, टिपणं...
फ्रेम... नात्यांची... बंध, भाव, सूत्र...
फ्रेम... कुटुंबाची... मूलाधार, आपुलकी, सच्चेपणा...
फ्रेम... प्रेमाची... माया, अलोट, स्पर्श...
फ्रेम... मैत्रीची... मैत्र, विश्वास, सहवास...
फ्रेम... भावनांची... कोलाहल, अनामिक, अनोळखी...
फ्रेम... व्यावहारिक... रोखठोक, संपत्ती, मालमत्ता...
फ्रेम... कलांची... अनुभूती, आस्वाद, अनुनय...
फ्रेम... अक्षरांची... शब्द, अर्थ, नश्वर...
फ्रेम... सामर्थ्याची... बळकट, तंदुरुस्त, सत्ताधीश
फ्रेम... अन्नाची... पाककृती, सुगरण, चविष्ट...
फ्रेम... स्पंदनांची... अर्थवाही, भाववाही, संवादी...
फ्रेम... मनांची... एकरुप, एकतान, एकताल...
फ्रेम... संगीताची... सूर, प्रवाही, श्वास...
फ्रेम... रिकामी... पोकळी, अवकाश, निःश्वास...
(फोटो – इंटरनेटवरून साभार)