प्रिय भक्तांनो,
नमस्कार! कसं काय चाललंय? मुद्दामच `ई माध्यम` वापरलं
नाही, तुमच्याशी संवाद साधायला. कारण `नेहमीपेक्षा वेगळं` कुणी काही केल्यावर त्याकडं तुमचं लक्ष वेधलं जातं, हे कधीचंच लक्षात
आलंय माझ्या. आणि हो, अनेक घरांत घट बसवले गेलेत. त्यामुळं तुमच्याशी संवाद
साधण्याचं काम अधिक सोपं झालंय. सध्याची परिस्थिती पाहाता, हा संवाद साधणं, हे
आवश्यकच वाटतंय, मला...
कसंए की, नेहमी भक्त देवाला-देवीला साकडं
घालतात, प्रश्न विचारतात. आतापुरती ही पद्धत आपण थोडी बदलूया. म्हणजे मी तुम्हांला
काही प्रश्न विचारते. आणि हो हल्ली तुमची धुसर होऊ पाहणारी विचारक्षमता आणि `वेळ नाही` ही सबब ध्यानी ठेवून या प्रश्नांना पर्यायही देतेय. तुमच्या मते, नवरात्र
म्हणजे काय? माझी अर्थात देवीची आराधना नि पूजा करणं/ मनसोक्त गरबा-दांडिया खेळणं/ स्त्रीशक्तीचा जागर
करणं की हे नऊ दिवस फक्त सेलिब्रेशन टाईम मानून ते जस्ट एन्जॉय करणं. बघा काय
उत्तर द्यायचं ते...
कसंए की, एकीकडं देवीचं स्वरुप म्हणून
स्त्रियांना मान द्यायचा नि दुसरीकडं स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करायचे... ही
कोणती मानसिकता म्हणायची? देवी म्हणून पूजताना मग त्या धार्मिक कार्याच्यानिमित्तानं केले जाणारे
उपासतापास, नेम आणि पारंपरिक गोष्टींची आज घडीला खरंच आवश्यकता उरलेय का? कितीजण-कितीजणी ते अगदी मनःपूर्वक करतात नि कितीजण ते केवळ परंपरा
पाळायची म्हणून करतात? दुसरीकडं स्त्रियांवर होणारा अन्याय,
अत्याचार तुमच्या चोहोबाजूला दिसतोय, मिडियातून त्याविषयी सतत मांडलं जातंय... पण
त्याविषयी `काही वाटून घेतलं` जातंय? की आपल्या नाकासमोर चालण्याचा हेका तुम्ही सोडणारात? की किमान पक्षी त्यासंदर्भात दोन्ही बाजू जाणून घेऊन आपलं मत मांडायचा
पर्यायानं विचार करायचा वसा तुम्हांला धरता येई का? आता
तुमची मानसिकता बदण्यासाठी कोणते पर्याय निवडता याचा विचार करूया. त्यासाठी
स्त्री-पुरुष समानता यायला हवी/ स्त्री सक्षमीकरण व्हायला
हवं/ पुरुषांची मानसिकता लहानपणापासून बदलायला हवी की
सामाजिक चालीरितींमध्ये काळानुरुप बदल व्हायला हवेत? बघा काय
उत्तर द्यायचं ते...
कसंए की, की `बदल करायचे` म्हटलं की त्याचा `श्रीगणेशा गिरवणं` गरजेचं ठरतंच. मग या बदलांची सुरूवात कुठून करावी?
स्वतःपासून/ घरापासून/ भवताल की
समाजापासून... तुम्हांला असे बदल होताना जाणवताहेत का?
असतीलच तर ते कुठंकुठं होताहेत?... सोशल मिडियात
लाईक-कमेंट-फॉरवर्ड करण्यापुरते/ समाजात वावरताना/ कॉलेज-ऑफिसेसमध्ये? की कुठंही हे बदल अद्याप
झालेलेच नाहीत, जे व्हायला कधीच सुरूवात व्हायला हवी होती?...
`नवरात्रा`चा खरा अर्थ प्रत्यक्षात
केव्हा येईल?... स्त्रियांचं सबलीकरण झाल्यावर/ स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आल्यावर/ तुम्ही
सारेजण `माणूस` म्हणून वागू लागल्यावर/ की तुम्हांला एखादा पर्याय सुचतोय एवढा सगळा विचार केल्यावर?... अजून वेळ आहे, माझ्या विसर्जनाला. त्याआधीच जमलं तर बघा काय उत्तर
द्यायचं ते...
तुमचीच,
देवी.
No comments:
Post a Comment