Sunday, 11 October 2015

पट्टीचा प्रसाद

एक होती मनी. गोबऱ्या गोबऱ्या गालांची. कुरळ्या केसांची नि टपोऱ्या डोळ्यांची. पण `मनी` हे तिचं खरं नाव नाही बुवा. तिचं खरं नाव होतं मनकर्णिका! आता एवढ्या अवघड नावानं कोण हाका मारणार ? मग `मनी` हेच नाव सगळ्यांच्या तोंडी बसलं.

आपली मनी होती पहिलीत, तेव्हाची ही गोष्ट! मनीच्या शाळेचा पहिलाच दिवस होता. सगळी तयारी झाल्यावर मनी मोठ्यानं बाsssय असं ओरडत आजोबांचा हात धरुन शाळेत गेली. शाळेचा पहिला दिवस मस्तच गेला. मुलांनी एजॉय केला. त्यातच समरचा वाढदिवस होता. त्यानं सगळ्यांना पट्ट्या वाटल्या, त्याही लाकडी!  आता आजच्या जमान्यात लाकडी पट्टी पाहिली कुणी होती? सगळ्यांकडं प्लास्टिकच्याच पट्टा होत्या ना!  मग काय? समरची कॉलर एकदम टाईट झाली. वर्गातल्या सगळ्यांनी ही पट्टी हातात घेऊनच घरी जायचं ठरवलं.

मनीला शाळेतून आणायला आजी आली होती. तिला त्या पट्टीचा प्रसाद द्यायची हुक्की मनीला आली. हलक्या हातानं तिनं आजीला पट्टी मारली. तिला वाटलं, आजी रागावणार नाही... आजीनं  फक्त मनीकडं आणि पट्टीकडं पाहिलं न पाहिलंसं केलंनं नि ती घराच्या दिशेनं चालू लागली. मग काय? घरी येताना वाटेतल्या झाडाझुडपांना, बसस्टॉपला, दुकानांच्या दारांना, गेटला अणि हो, घरच्या दरवाजालाही `पट्टीचा प्रसाद` मिळाला. कुणाला कमी, कुणाला जास्त, इतकंच.

घरात शिरतांनाच मनी पट्टी नाचवत ओरडली, हेsss मला पट्टी मिळालीsss येsss मनीच्या ओरडण्यानं पुस्तक वाचतांना डोळा लागलेले आजोबा दचकून जागे झाले. टॉमी भूsss भूsss करत एकदम घाबराघुबरा झाला. पण तिला काहीच फरक पडला नाही. हातपाय धुऊन दूध पिऊन झाल्यावर ती नेहमीसारखी अभ्यासाला बसली खरी, पण सारं लक्ष त्या पट्टीकडं होतं. मग बेरजेच्या वजाबाक्या झाल्या नि गुणाकारांचे भागाकार. सगळी स्पेलिंग चुकायला लागली. मनी अभ्यास तसाच ठेऊन उठली. पट्टी हातात घेतल्यावर तिला बरं वाटलं. मग टेबल, सोफा, खुर्ची बेड... कुण्णी म्हणून तिच्या तावडीतून सुटलं नाही.


एवढं होईपर्यंत आई–बाबा ऑफिसमधून आले. त्यांना पट्टी दाखवून झाली. जुन्या शिलाई मशीनवर आई शिलाई करायला लागली. पायी चालवाच्या त्या मशीनचा पेड्ल आणि चाक यांचा आवाज नि गती मनीला खूणावू लागली. आई दुसऱ्या कामाला उठल्यावर झटकन मनी पेड्लवर बसली नि मशीन फिरवू लागली. ठ्याकsss ठ्याकsss आवाज येऊ लागला. चाक फिरू लागलं. मग हातातली पट्टी त्यात जाऊ लागली. आतsss बाहेरsss.... आतsss बाहेरsss.... सगळ्यांनी समजावूनही मनी कुणाचंही ऐकत नव्हती. एका नव्याच खेळाचा तिला शोध लागला होता. मग झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी, शाळेतून आल्यावर सारखा हाच खेळ. पट्टीचा आवाज आणि मज्याच मज्याच... घरच्यांचा धाक, ओरडा, प्रेमळपणा... कसलाच परिणाम मनीवर झाला नाही. एक दिवस अशीच खेळत बसली होती, खेळता खेळता कड्sssफटाक्sss असा आवाज झाला नि पट्टी तुकडेतुकडे झाले. बापड्या पट्टीनं तरी किती सहन करायचं ना?... पट्टीचे तुकडे पाहून मनीला रडू फुटलं. तिची लाडकी पट्टी तुटली होती. आता ती कुणाशी खेळणार होती? तिनं ते तुकडे जपून ठेवले, अज्जिबात मस्ती करायची नाही, असं मनाशी ठरवून. शहाण्या मुलीसारखा अभ्यास करून मनू खूप खूप हुशार झाली. एकदम फेमस पर्सनॅलिटीच... त्या पट्टीचे तुकडे अजूनही तिच्या घरात फ्रेम करुन ठेवलेत... `पट्टीचा प्रसाद` म्हणून... 

          

4 comments: