आsssवाsssजsss
जाणीव–नेणिवेच्या प्रदेशातल्या
सीमारेषांपाशी घुटमळताना भोवती कितीतरी आवाजांचा हाsss भलाथोरला पसारा असतो. हे `आवाज` त्या त्या प्रदेशांतले, त्या त्या भाषांतले,
समूहांमधले नि व्यक्तींनुसार बदलत जातात...
एकेकाळी घराघरांतील सकाळ `आकाशवाणी`च्या`मंगलप्रभातsss`नं उजाडायची. `आकाशवाणी`च्या आवाजी दुनियेनं अनेकांना ज्ञानसमृध्द केलं होतं नि आजही करतेय... मात्र
आताशा श्रोत्यांची संख्या रोडावलेय. आकाशवाणीला पर्याय उभा राहिलाय एफएमचा.
त्यांची जागा घेतलेय २४ तास कार्यक्रमांचा रतीब घालणाऱ्या वाहिन्यांनी... त्यात
केवळ आवाज नाही दृश्यही आहेत. सकाळच्या ऐन घाईत असताना पाहायला वेळ असतो कुणाला...
मग येता–जाता ऐकायचा बातम्या किंवा अध्यात्मिक कार्यक्रमांचा `आवाज`... आतातर हे आवाजही मागं सरकताहेत नि वरचढ ठरतोय
हातातला स्मार्टफोन, ढीगभर अँप्सच्या `आवाजी नोटिफिकेशन्स`सह...
सकाळच्या वेळी प्रसंगानुरुप घराघरांत
वृत्तपत्र वाचण्यावरून होणारी भांडणं, चहा पिताना वा बिस्किटं खाताना होणारे `आवाज` आताशा शिष्टसंमत
मानले जात नाहीत. बाळाला न्हाऊ घालतांना `गंगेsssगोदे`चा स्वर केव्हाच लुप्त झालाय. आताशा असतो फक्त
शॉवरच्या पाण्याचा `झुळझुळीत` झरा...
मगचं पटापटा-खसाखसा पुसणं अणि वाऱ्याच्या वेगानं सारं आवरुन घराबाहेर पडायची घाई.
त्यातच दुधवाला, केरवाला, इस्त्रीवाला आदींच्या सतत वाजणाऱ्या बेलांच्या `आवाजा`ची भर... मध्येच वाजणारी कुकरची शिट्टी नि
मोबाईलचे विचित्र आवाजाचे रिमांईडर्स... या गदारोळात पहाटपाखरांचा किलबिलाट, वाऱ्याची
हलकिशी झुळुक... उजाडतानाचा `सायलंट आवाज` ऐकायला कुणाला सवड नाहीये. आवरुन घराबाहेर पडल्यावर स्कूटीला किक
मारताना, वॉचमनला हाकाट्या करताना, ट्रॅफिकच्या भुलभुलैय्यातून वाट काढत हॉर्न
वाजवला जातोच. किंवा मग धडाडणाऱ्या लोकल्स नि खंडीभर स्टॉप घेत भोंगे वाजवत
धावणारी बस या आवाजांशी आपली लय अनेकजण जुळवू पाहतात. ऑफिसच्या रस्त्यावर धडाधडा उभे रहाणारे, शहरातल्या
चाळींना मुडपून टाकून शाहजोगपणं उभे राहणारे टॉवर्स नि त्यांच्या बांधकामांचे ठोकsssठाकsss...घर्ट्टरsssखर्ट्टरsss आदी चमत्कारिक आवाज येत असतात. आपण ते आवाज कानाबाहेर टाकण्याचा निरर्थक प्रयत्न
करतो.
ऑफिसला पोहचता पोहचता कानाला जाणवणतं
रस्त्याच्या कडेच्या भटाकडचं चहाचं उकळतं आधण, हायsssहॅलोsssचे आवाजी
फवारे नि पुढ्यातल्या पीसीची वेलकम नोट पाहात
चढत्या भाजणीनं कामाला सुरवात होते. पंख्यांच्या घरघराटाची जागा ऑफिसबाहेच्या
गुरगुरणाऱ्या एसीनं केव्हाच बळकावलेय... अजूनही येतोय डब्बेवाल्यांच्या सायकलची
नेमानं वाजणारी घंटी नि आपल्या डेस्कवर डब्बा ठेवण्याचा आवाज... मध्येच कामवाल्या
बाईचे, मुलांचे, निरोपानिरोपीचे, मित्रमैत्रिणींचे फोन्स सुरुच असतात. आजची मुलं
तर कितीतरी आवाज ऐकायला मुकली आहेत. कडकलक्ष्मी, वासुदेव, गोंधळी, नंदीबैल नि इतर
लोककलांचे आवाज मुलांना फक्त वाहिन्यांवरच्या मनोरंजनाच्या माध्यामातून कळतात. एके
काळी गायवाली `येsss ये बेबी येsss... गायवाली येsss` म्हणत रस्तोरस्ती फिरणारी
गायवाली आता एका जागी निवांत बसून असते. कल्हईवाला, झाडूवाला, खटर्रsssटर्रsss आवाज करणारा कापूसवाला, भांडीsssयsss... आवाज देणारी भांडीवाली अशी `आवाजी मंडळी` जणू अदृश्य झालेत. `सुरमई, पापलेट कोळंबीsss` असे
विशिष्ट वारी वाटे घेऊन येणारी रस्त्यानं जाणारी कोळीण ऐकू येते. `म्हतारीचाsss कापूसsss`, `चनाचोरsss गरमsss` नि `चिंचाsssआsssवळेsssबोsssरंsss` या हाळा दुर्मिळ
झाल्यात. आताशा या चटकमटक आवाज करत खाल्ल्या जाणाऱ्या खाऊला तितकासा `स्टेटस्` उरलेला नाही, की अद्याप त्यांचा कोणाताही `ब्रँण्ड` डेव्हलप झालेला नाही. नाही म्हणायला अजूनही
खाऊगल्ल्या नि गल्लीच्या कोपऱ्यावरचे `चुsssरsssसुsssर` आवाज करत तयार होणारे वडे-सामोसे, `सस्सsss` करत मिटक्या मारत खाल्ल्या जाणाऱ्या चाटची चलती आहे. त्या आवाजांच्या
साथीनंच जणू संध्याकाळ उगवते... घरी परतताना पुन्हा तेच ते सारे `आवाजी चक्र`. घरी जाण्याच्या सगळ्यांच्या घाईमुळं
ट्रॅफिकचा कायमचा वाजलेला बोऱ्या नि कर्णकटू हॉर्न्सचं बॅकग्राऊंड म्युझिक...
त्यात घराघरांतल्या डेली सोप्सच्या आवजांची भर... ध्वनी प्रदूषणाबद्दल कितीही
लिहिलं-बोललं गेलं तरी सर्व धार्मिक सणवार-उत्सव-परंपरा-मिरवणुका यांच्या `आवाजी अस्तित्वा`ची जाणीव कानोकानी होत असतेच...
या `रुटिन आवाजां`ची
दुनिया कधीतरी अचानक क्षणभर थबकते... निमित्तमात्र ठरतात ते २६जुलै/ रेल्वे बॉम्बस्फोट/ दहशतवादी हल्ले... तेव्हा जाणीव-नेणिवेचा मोठा कल्लोळच माजतो... पण हे
घडतं केवळ काही क्षणांसाठी... पुन्हा एकदा `चलेsssचलोsss` म्हणत मुंबईकरांचं `लाईफ
रिस्टार्ट` होतं. मग त्या `धावत्या
लाईफ`ला `मुंबई स्पिरिट` असं गोंडस नाव दिलं जातं... खरंच `लाईफ स्पिरिट` असतं की `जगण्यातली अपरिहार्यता`... अंधाराला झाकोळणाऱ्या निऑन साईन्सच्या चकचकाटात रात्र कधीच निवून
जाते. पाखरांच्या किलबिलाटात नवे किरण खिडकीपाशी येतात... त्याला असतो `आशेचा नि स्वप्नांचा आवाज`... तो `आवाज` सातत्यानं टिकवू पाहणारा असतो प्रत्येकाचा `आतला आवाज`... इथंच सुरू होतो पुन्हा जाणीव-नेणिवेचा
प्रदेश... फक्त ओळखायला शिकला पाहिजे... `आवाज`...
सुलेखन - जयंत कुंटे.