Sunday, 23 July 2017

पाणी... बाटली... पाणी...

त्या दिवशी कामानिमित्त पोहचायचं होतं एके ठिकाणी वेळेत. मग धावतपळत स्टेशन गाठलं. स्टेशनरोडवरच्या वाटेतला चिखल, खड्डे आणि प्लॅस्टिकचा भस्मासूर जागोजागी आपलं अस्तित्व दाखवून देत होता. ते सारं काही टिपिकल मध्यमवर्गीय नजरेआड करून चालत राहिले मुकाट स्टेशनची वाट. तिकिट काढलं. धडधडती गाडी येऊन थडकलीच होती. चटचटा ब्रिजच्या पायऱ्या उतरून, गनिमी कावा साधत, मुंबईकरांच्या अंगभूत चपळाईनं लक्ष्य गाठलं. गाडी सुटली... गाडी पकडता आल्याचा आनंद मनाजोगती जागा मिळाल्यावर व्दिगुणित झाला. हुश्शsss करून टेकले. समोरच्या बाकावर नजर गेली नि कडूजार गोळीनं तोंडभर पसरणारी चव क्षणभर आठवली... आता प्रवासभर हे सहन करावं लागणार होतं. इतरांप्रमाणं नशीबाला दोष देत जागा बदलायची संधी होती आणि तशी जागाही होती. पण... पण तिनं तर मला जवळपास खिळवून ठेवल्यासारखं झालं होतं... पुन्हापुन्हा माझी नजर तिच्याकडंच जात होती. मधल्या स्टेशन्सवर होणारा जुजबी चढ-उतार आमच्यात कोणताही अडथळा आणत नव्हता. बाकीच्या आमच्या बाकांच्या आगे-मागे, शेजारी बसत होत्या. हाच क्षण साधला गेला जणू नि आमच्यातल्या काल्पनिक संवादाला मोकळं रान मिळालं...

प्रश्न – कोण ग तू?
उत्तर – प्लॅस्टिकची बाटली
प्रश्न – कुठून आलीस?
उत्तर – माहिती नाही.

(स्वसंवाद – हे बाकी खरंए. ना तिच्यावर कोणतं लेबल होतं ना कोणत्या कंपनीचा चटकन दिसेलासा छाप.)

प्रश्न – कोणी तुला इथं ठेवलं?
उत्तर – माहिती नाही.
प्रश्न – तुझ्यात काय आहे?
उत्तर – पाणी... पाणी...
प्रश्न – पण अर्धीच बाटली पाणी...
उत्तर - माहिती नाही.

(स्वसंवाद – हे बाकी खरंए. बाटली रिकामी आहे की भरलेली हे पाहाणं, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे.)

त्यानंतर आदळू लागले प्रश्न नि तर्कटलेले विचार... कारण तिच्याकडं उत्तरं नव्हतीच.
प्रश्न – तुझी मालकीण कोण?
प्रश्न – पाणी अर्धवट का प्यायलं गेलंय?
प्रश्न – बाटली गाडीत का ठेवली?
प्रश्न – पाणी नको असलं, तरी बाटली घेऊन जायची. झाडांना घालायचं ना?...
प्रश्न – कदाचित पर्समध्ये जागा नसेल नि बाटलीची अडगळ वाटली असेल?...
प्रश्न – कदाचित घर जवळ असेल, आणखी पाणी नको असेल?...
प्रश्न – कदाचित ती आळशी असेल?...
प्रश्न – कादाचित तिच्याकडं पाणी भरपूर असेल?...

sssहो... या मुद्द्यावर गाडी अडकलीच... त्याभोवतीच्या शक्यतांचा वेढाच पडला जणू. की पाणी भरपूर असणारी ती कुठं राहात असावी?, पाणी विकत घेतलं असेल? की घरातलंच भरून घेतलं असेल?, विकत घेतलं असेल तर बाटलीवर लेबल कसं नाही?... कायदा तर म्हणतो... वगैरे वगैरे. त्या नंतर त्या बाटलीच्या भविष्याचा अंदाज घ्यायला मन कचरू लागलं. अशा माणशी बाटल्या विसरल्या गेल्या तर... या बाटल्यांची संख्या वाढली तर... या बाटल्यांचा डोंगरच होईल एक कादाचित... तो पार कसा करणार आणि त्यानंतर तरी पाणी हाती लागेल का... की सरळ ही बाटली उचलावी आणि स्टेशनवरल्या प्लॅस्टिक बाटली क्रशरमध्ये टाकावी...

``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं भासवलं. नकळत हात तिला उचलायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... ती मात्र खोलवर विचारांत दडून बसली... काम संपवून दुसऱ्या गाडीनं घरी परतू लागले. आसपासच्या बाकांवर सहप्रवासिनी होत्या नि ती नव्हती. मनाशी हुsssश्श म्हणतानाच दिसलं पाणी... माझ्याच बाकावर होतं... पावसाची झड आली असावी खिडकीतून... ठीकए ना... आपण काय करणार? असं मनात पुटपुटतानाच जाणवलं, तिचं अस्तित्व!!! माझ्याच पर्समध्ये, समोरचीच्या बॅगमध्ये, पलीकडच्याच्या सॅकमध्ये, डबाभर, गाडीभर, स्टेशनभर... तिचं अस्तित्व विस्तारतच गेलं झपाट्यानं... क्षणभरात पुन्हा भास झाला... प्लॅस्टिकच्या बाटलीचा झाला डोंगर... पाणी आपल्यापासून दुरावतंय फर्लांगभर... वो किस की हैं? मेरी, आपकी, उसकी?...

``अगला स्टेशन...`` या गाडीतल्या घोषणेनं भानावर आले. माझं तिच्याकडं पाहात राहाणं, डब्यातल्या काहीजणींच्या लक्षात आलं असावं. कसंनुसं हसून मी काहीच न झाल्याचं भासवलं. नकळत हात ते पाणी पुसायला लांबवला नि क्षणार्धात तो मागंही आला. टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोनाचा अडसर उभा राहिलाच. माझ्या स्टेशनवर मी उतरून गेले... आता घराकडं परतायची लगबग... ती मात्र खोलवर विचारांत दडून बसलेली आहे... पावसाच्या पाण्याचे सपकारे बसू लागले चेहऱ्यावर... तरी छत्री न उघडता तशीच चालत राहिले... विचारांच्या सरींवर सरी पडतच होत्या... गाडी, बाटली, पाणी... अन् बाटली, पाणी... अन् पाणी... पाणी...




(छायाचित्र – राधिका कुंटे.)

Sunday, 9 July 2017

`फिलिंग थॉटफुल`...


`फिलिंग थॉटफुल` लिहून काढले जातात ढग
त्या ढगांपलिकडं असतं का हो जग?
त्या ढगांच्या किनारींना वास्तवाचे रंग
त्या ढगांच्या रेखाटनांना वास्तवाचा संग
त्या ढगांतून कोसळतो विचारांचा पाऊस
थेंबाथेंबांतून भरतो जाणिवांचा ऊरुस
जाणिवांच्या बीजांना संवेदनांचं आवरण
लगेच घेतात मनाच्या जमिनीवर लोळण
मनाच्या जमिनीची हवी मशागत करायला
शिकावं लागेल तिला विचारधारी व्हायला
विचारांची बीजं पडली की हो मनांत...
काहीकाही तरी रुजली काही जनांत...
मनातल्या रोपांचं रुप वेगवेगळं
कशी काय वाढतील विचारांची बाळं?
कधी तरारून, कधी झरझर
कधी संथ लयीत कधी भरभर
कधी कच्चा, कधी पक्का
विचारांचा बुंधा वाढवतो सत्ता
कधी भावनांच्या वेली जातात आवळल्या
कधी खुडल्या जातात कळ्या कोवळ्या
कधी विषाची फळे गोमटी
कधी व्देषाची फुले कपटी
वाढतं मग कोलाहलचे रान
सुटते तेव्हा विचारांचे भान
संवेदनांचा पडतो दुष्काळ
जाणिवांचा खोल डोह अपार
मनाच्या तळघरात बांधलेली भूतं
पळतात सैरावैरा होऊ `सोशल पोस्ट`
क्लिकले जातात फोटो
रेकॉर्डले जातात व्हिडिओ
व्हायरलची येते साथ
नेणिवेतले विचार भुईसपाट
पुन्हा एकदा वाटतं `फिलिंग थॉटफुल`
काढला जातो ढग ब्युटीफुल
जाणायचं असतं जग पलिकडलं
जगावसं वाटतं किनाऱ्यावरचं
ढगांपेक्षा वाटू लागतो समुद्र आपलासा
विचारांच्या लाटांचा वाटतो भरवसा
संवेदनांचा जमतो कोरडा पापुद्रा
आली आली आली लाट...
लवकर पळ काढ समुद्रा
समुद्र पळून चालेल कैसा?
आपल्याचभोवती आवळला फासा
विचारांच्या पाण्याची होते वाफ
ढगाढगा कर मला माफ!!!
मनाची मशागत नाही झाली पुरी
विचारांची रोपं अजूनही साधीभोळी
तर्कांचं खत आणि नेणिवांची माती
सत्याचं सिंचन आणि मोकळा वारा साथी
स्वप्नकल्पनांचं तण काढायला हवं दूर
परिस्थितीचा पडताळता यायला हवा नूर
विचारांच्या क्षितिजाचा विस्तारे परीघ
ढग आणि समुद्र आता आले समीप
विचारांचा पाऊस लागलाय पडू...
फिलिंग आता काय काय लिहू?...


(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)


माझ्या ब्लॉगची नव्वदावी (९०) पोस्ट.



Sunday, 25 June 2017

पाऊस पाऊस पाऊस पाऊस


पावसाआधी होता पाऊस... पावसानंतर होता पाऊस...
पावसासंगे होता पाऊस... पावसाविरुद्ध होता पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पावसाचा मित्र पाऊस... पावसाचा शत्रू पाऊस...
पावसाचा गोतावळा पाऊस... पावसाचा परका पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पाऊस सरसर... पाऊस झरझर...
पाऊस गडगडाट... पाऊस कडकडाट...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पावसाळी विजा चमकणं... पावसाळी कल्पना सुचणं...
पाऊस हिरवागार... पाऊस पाणीदार...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

पाऊस टपटपणारा... पाऊस कोसळणारा...
पाऊस ओलागच्च... पाऊस सच्चा मित्र...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस वळणदार... एक पाऊस समुद्रापार...
एक पाऊस लहरी... एक पाऊस भिरभिरी...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पावसाळी नाव... एक आठवणींचा गाव...
एक फुल उमलणारं... एक नातं फुलणारं...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस कटिंग चाय... एक पाऊस विचारांची साय...
एक पाऊस तरणा, एक पाऊस म्हातारा...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस पावसाळी... एक पाऊस अकाली...
एक पाऊस अंकुरता कोंब... एक पाऊस पिकलं झाड
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एका पावसाचं महाभारत... एका थेंबाची कविता...
एका सरीचं गाणं... एका सरव्याचा पोवाडा...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...

एक पाऊस पाऊस... दोन पाऊस पाऊस
एक पाऊस पाऊस... पाऊस दाहे पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस...
पाऊस पाऊस पाऊस पाऊस... 



(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)

Sunday, 11 June 2017

एखादं नातं...


 एखादं नातं... होतं सावली घनदाट
एखादं नातं... पायांत घुटमळत राहातं
एखादं नातं... फरफटत पुढं येतं
एखादं नातं... एकदम तटस्थ राहातं
एखादं नातं... उत्स्फूर्तपणं उत्साहात बहरतं
एखादं नातं... होऊन जातं एकदम शिळंपाकं
एखादं नातं... राहातं उत्फुल्ल ताजंतवानं
एखादं नातं... रुतत जातं चिखलगाळागत
एखादं नातं... भासतं रेशमी जरीकाठी
एखादं नातं... वाटतं साधसं उबदार
एखादं नातं... असतं अबोल पण कृतीप्रवण
एखादं नातं... असतं बोडकं आणि कृतीशून्य
एखादं नातं... कधी कलंकित कधी शब्दांकित
एखादं नातं... कधी लाचार कधी मनस्वी
एखादं नातं... मती कुंठित करणारं
एखादं नातं... राहातं कमळासारखं निर्लेप
एखादं नातं... असतं भोगी किंवा वैरागी
एखादं नातं... सोसवेना भार मायेचा
एखादं नातं... सुटकेचा हुश्श निःश्वास
एखादं नातं... मुरांब्यासारखं आंबट-गोड
एखादं नातं... कारल्यासारखं कडवट
एखादं नातं... गरजवंत, अक्कलवंत
एखादं नातं... ओवाळण्यापुरतं, स्थिरावण्यापुरतं
एखादं नातं... कायम हाकेला ओ देणारं
एखादं नातं... तात्पुरतं, औटघटकेचं
एखादं नातं... कधी रक्ताचं, कधी बिनरक्ताचं
एखादं नातं... कधी मैत्रीचं, कधी व्देषाचं
एखादं नातं... `Feeling` मिरवण्यापुरतं
एखादं नातं... `Feeling` अतूट बंधांचं
एखादं नातं... एखादं भयंकर स्वार्थी
एखादं नातं... एखाद्याची कायम अर्थाअर्थी
एखादं नातं... जीव ओवाळून टाकावा असं
एखादं नातं... जीव नकोसा व्हावा तसं
एखादं नातं... फिनिक्स भरारी घेणारं
एखादं नातं... मातीमोल ठरणारं
एखादं नातं... करतं नात्यांच्या सीमापार
एखादं नातं... अनामिकतेचा असे अपार
एखादं नातं... नात्यांची वीण सोडवणारं
एखादं नातं... नात्यांच्या लडी गुंफणारं
नाती म्हणजे... जगण्याची उर्जा लई भारी
नाती म्हणजे... `Feeling` कायमच नातेसमृद्ध...
एखादं नातं... एखादं नातं...
एखादं नातं... एखादं नातं...


** ताजा कलम **

 एखाद्या नात्याच्या शब्दरंगाचे एखाद्या नात्याच्या शब्दरंगाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...

`Feeling` एखादं नातं...

  

छायाचित्रं इंटरनेटवरून साभार. 

Sunday, 28 May 2017

`तो` माझा `सांगाती`

क्लिक... क्लिक... अगदी अस्साच नाही, पण काही अंशी असा आवाज किंवा तत्सम क्रिया आपल्या भोवताली किंवा अगदी आपल्याच हातात सर्रासपणं घडते. तो तो क्षण हमखासपणं टिपून ठेवला जातो... एकदम स्मार्टली... `छोटी छोटी बातें` एकदम परफेक्टली कॅच होतात त्याच्यात. `टिपणं` या शब्दाच्या साऱ्या छटा या यंत्रानं आत्मसात केल्यात असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. काळा पडदा डोक्यावर पांघरून नाना हिमकती साधत काढलेल्या `फोटू`पासून ते लेटेस्ट स्मार्टफोनमधल्या कॅमेऱ्याच्या सेटिंग्जच्या साहाय्यानं एका क्लिकसरशी काढलेला `पिक` हा साराच प्रवास फारफार अवाढव्य क्षणांना वेढून उरणारा आहे. कॅमेऱ्याच्या क्रांतीतले बदल आणि तांत्रिक बाजू वगैरे सांगण्याच्या फंदात पडणार नाहीये. पण कॅमेऱ्याबद्दल काही नक्कीच शेअर करता येईल, असं वाटतंय...

`त्याची` नि माझी ओळख झाली लहानपणीच. रोलवाला कॅमेरा होता तेव्हा आमच्याकडं. बाबाची हौशी फोटोग्राफी फार चालायची तेव्हा. बाबानं ``अशी उभी राहा, तशी उभी राहा`` म्हटल्यावर तसं करायचं एवढंच माहिती होतं. मग त्यासाठी उन्हातान्हातलं बागेत जाणं असो किंवा गच्चीत जाऊन फोटो काढणं असो... त्या सांगण्याचं पुढं काय होतं, ते समजून घ्यायची उत्सुकता नव्हती... कदाचित तो त्या वयाचा फॅक्टर असेल, नंतर खेळायच्या खेळाकडं ध्यान असेल... किंवा कदाचित आजच्यासारखा लगेच फोटो दिसला असता तर तो पाहिलाही असता... तेव्हा फोटो डेव्हलप होऊन हाती पडेपर्यंत वाट पाहायला लागायची. काही काळानं कुठंकुठं फिरायला गेल्यावर मीपण फोटो काढते, असा लग्गा लावायला लागले नि तसे काही फोटो काढलेही... फुलांचे-पानांचे, आई-बाबाचे वगैरे वगैरे... तरीही ते हाती पडल्यावर ``हा मी काढला, हा मी काढला`` इतकंच बाकीच्यांना सांगून अल्बम कपाटात रवाना होई.

पुढं अभ्यासाच्या नादात कॅमेरा बाजूलाच पडला. शब्दांचं वेड वाढत गेलं... वाचन नि काहीबाही लेखन वगैरे वगैरे... अर्थात ते अजून कायम आहेच. पण मग कुठेसं फिरायला गेलो होतो तर काकाचा कॅमेरा उसनापासना आणून फोटो काढले आणि पुन्हा एकदा त्या फोटो काढण्यातली मज्जा नव्यानं समजली. मग त्याच नादात एका टप्प्यावर घेतला कोडॅकचा डिजिटल कॅमेरा. हा कॅमेरा हाती आल्यावर भटकणं वाढलं किंवा मग भटकत होते नि कॅमेरा हाती होता... बऱ्याचदा एकटीनं, घरच्यांसोबत, मैत्रिणींसोबत, बहिणीसोबत, भावासोबत, मित्रमंडळींसोबत काहीबाही टिपत राहिले... मधल्या काळात साधा फोन गायब होऊन हातात आला स्मार्टफोन. पहिला, दुसरा... असं होतं ते मोजणं केव्हाच मागं पडलं... कॅमेऱ्याचे फंक्शन्स कसे नि किती आहेत, ते पहिल्यांदा बघून मग फोन घेतला जाऊ लागला. कोडॅकचा डिजिकॅम बाबा आदमच्या जमान्यातला होऊन गेला... कोपऱ्यात पडून राहिला बिचारा... मध्यंतरी घरातल्या आवराआवरीत बाबाचा एक जुना कॅमेरा सापडला. मग त्यानं काही दिवस अँण्टिक पीस म्हणून टिव्हीशेजारची जागा पटकावली होती. त्याचे फोटोग्राफी डेला फोटो काढले गेले, अर्थात स्मार्ट फोन कॅमेऱ्यानं...

आताशा हा स्मार्टफोनवरचा कॅमेरा चिक्कार भाव खातोय. त्यातही निसर्ग आणि खादाडीसह बाकीच्या गोष्टी टिपून देतोय. मग एका मित्रानं नावही बहाल करून टाकलं `फुलवेडी` वगैरे... तर आताचा हा कॅमेरा येता-जाता, हवं ते हवं तेव्हा हवं तस्सं टिपून घेतोय. मग त्यातलेच काही सोशल मिडियावर, ब्लॉगसाठी अपलोड केले जातात... तेही एक यक्षप्रश्न शिल्लकीत आहेच की, फोटो अपलोड करावेत की नाहीत... काही अपलोड केले जातात, काही अपलोड होत नाहीत... किंवा मग काही तस्सेच थेट लॅपटॉपच्या फोल्डर्समध्ये रवाना होतात... शिवाय अलीकडची कॉपी-पेस्ट संस्कृती लक्षात घेऊन त्या फोटोंवर नाव लिहावं लागतं... नाईलाजानं... काही वेळा फोटोंना दाद मिळते, भरभरून... ते ठीक आहे. माणसं दाद देतात, फोटो पाहातायत, असं वाटतं एकीकडं... पण... पण ते खरंच खरं असतं की, केवळ `क्लिकलेला` असतो लाईक, हार्टचा पर्याय... काही कळत नाही बुवा कधीकधी... बरं, ही प्रतिक्रिया फोटो काढण्याच्या कौशल्याला असते की, त्या फोटोच्या विषयाला असते की दोन्हीला की, आपलं फक्त `क्लिकायचं` म्हणून क्लिकायचं... शप्पथ... आपल्याला प्रश्न तर फार पडतात राव... म्हणून तर हे असं शब्दांतून व्यक्त व्हावं लागतं... पण काही वेळा त्याहूनही अधिक-उणं उरतंच... ते कॅमेऱ्यात टिपायची धडपड होते... तरीही या दोन्ही माध्यमांतून निसटूनही असंख्य गोष्टींचं अस्तित्व जाणवतंच... ते कशानं टिपावं, कसं तुमच्याशी शेअर करावं...  हा प्रश्न पुन्हा उरतोच... या घडीला शांताबाईच्या ओळींचा संदर्भ आठवतोय, ``क्षण दिपती, क्षण लपती...`` हे तेवढं खरंए... ते कसं काय टिपावं बुवा?... ते टिपणं साधलं पाहिजे नाही का?...  कदाचित केव्हा तरी कधी तरी या प्रश्नाचं उत्तर मिळेलही... तेव्हा बोलूच...




छायाचित्र – इंटरनेटवरून साभार.