Saturday, 25 November 2017

आठवणींचा गजरा



आठवणी... लगडून येतात... फुलांसारख्या असतात. गंधित, सुगंधित... काही असतात घट्ट कळ्यांसारख्या... एकदम नाजूक, सुकुमार... कोमल, नाजूक... काही असतात, गुलाबी... गुलाबाच्या फुलाप्रमाणं गुलाबो रंगाच्या, गुलाबी ढंगाच्या, पाकळ्यांच्या... काही आठवणी असतात एकदम रंगीत... जलबेराटाईप... एकदम तरोताज्या... काही वेळा फुलांच्या आठवणींनाच लगडून येतात, काही माणसांच्या, काही व्यवसायांच्या, काही ठिकाणांच्या, काही काहीबाही आठवणी... कधी अशाच ट्रेनमधल्या, फुलवाली, गजरेवालीच्या, त्यांच्या फुलांसकटच्या आठवणी... तर काही उगाचच दुरूनच न्याहाळलेल्या... फुलांच्या आठवणी... कधी एखाद्या फुलवालीनं आपणहून दिलेल्या एक्स्ट्रा फुलाचा एक्स्ट्रा सुगंध... तर कधी ठामपणानं ठरलेलेच पैसे घेणारी गजरेवाली... कधी पुढ्यातल्या छोटीला पाजतानाच फुलं विकणारी आई फुलवाली... कधी शेजारी खेळणाऱ्या लहानग्याला दटावत फुलांची वेणी गुंफणारी वेणीवाली...

कधी चक्क ट्रेनमधली चिमुरडीच आठवते तिच्या निरागसपणासकट... एकदा मी विंडोसीटला बसले होते. माझ्याच शेजारी एका फुलवालीनं तिची टोपली ठेवली होती... फुलं-गजऱ्यांनी भरलेली. तिला काहीसं वाटलं नि तिनं थेट विचारलंच की, ``दीदी, पानी हैं?...`` होकार देत तिला पाण्याची बाटली दिली. तिनं एकाच दमात घटाघट सगळं पाणी पिऊन टाकलं. बाटली परत देताना काहीसं वाटून तिनं विचारलं... ``तुम्हें तो पानी...`` मी फक्त हसले. तिच्याकडून काही फुलं-गजरे विकत घेतले नि आणखी बायका डब्यात यायच्याआधी तिला विचारलं - (टिपिकल मध्यमवर्गिय वृत्तीनं) ``तुझ्या फुलांचा फोटो काढला चालेल का ग?`` ती म्हणाली हा... मग झटपट २-४ फोटो काढले. ती बघतच राहिली... तिच्या दृष्टीनं फुलांचा फोटो काढणं हा वेडेपणा असावा किंवा मग कदाचित `मोबाईल फोटोसेशन` तिच्या सवयीचा एक भाग झालं नसावं अद्याप... मला तिची फुलं-गजरे नि त्यांच्या `सुगंधाची श्रीमंती` जाणवली... भावली... मग ती पटदिशी निघून गेली पुढच्या डब्यात किंवा मग पुढच्या स्टेशनवरही... आता लिहिताना तिच्यातला किंचितसा व्यवहारीपणाही जाणवतोय...

कधी एखादी रोखठोक खमकी गजरेवाली भेटते. तर कधी एखादी म्हातारी आज्जी तिच्या सुरकुत्यांइतक्याच मायेनं गुंफलेले गजरे आपल्या हाती सोपवते. कधी संसारातल्या अडीअडचणींनी गांजलेली मध्यमवयीन गजरेवाली तिचे व्यापताप आपल्यापाशी घडाघडा बोलते. कदाचित चार गॅसिप करणाऱ्या इतर गजरेवाल्यांपेक्षा आपल्यासारखी तिऱ्हाईत माणसं जवळची वाटत असू... गजरेवाल्यांच्या तुलनेने गजरेवाले कमी झालेले दिसतात आताशा... किंवा बऱ्याचदा कुटुंबासमवेत असतात. एक गजरेवाले म्हातारबा, एक फुलं-गजरेवाले काका, एक फुलंविके दादा असे काही मोजकेचजणं आत्ता आठवताहेत... खरंतर या फुलं-गजरे विकणाऱ्या माणसांपेक्षा त्यांच्या फुलांचा, गजऱ्यांचा सुवास मनात दरवळतो आहे. आठवणींचा हा सुगंध अनेकदा रेंगाळत राहातो मनात... या आठवणींच्या कुपीची जादू कायम राहावी हेच खरं...



(सर्व छायाचित्रं- राधिका कुंटे)


(शंभरावी (१००) ब्लॉगपोस्ट)


(*या टप्प्यावर शब्दफुलांची ओंजळ घेणार आहे अल्पविराम. पुढचे अपडेट मिळतीलच.*)



Sunday, 12 November 2017

तांबटपुराण

साधारणपणं पाच-सहा वर्षांपूर्वी स्वयंपाकघराच्या खिडकीपासच्या उंबराच्या झाडावर एक चिमणीएवढा पक्षी काही क्षण दिसला नि एकदम गायब झाला. फक्त वाव... एवढेत उद्गार निघाले... घरातल्या बाकीच्यांना तो दिसू शकला नाही, अशी हळहळही वाटली. काही काळानं पुन्हा एकदा तो दिसला आलेला... थोडासाच वेळ होता नि पुन्हा गायब झाला. मग त्याच्या येण्याची वेळ बघितली नि जणू तो आल्यावर घड्याळ लावून घ्यावं जवळपास इतक्या काटेकोरपणं नि नियमित तो येत राहिला...

एक दिवस तो सकाळचा आला... फांदीला भोक पाडत राहिला... तितक्यात पालिकेची माणसं आली फांद्या तोडायला... कुणाकुणाच्या घरात अंधार येत होता... किडे-किटक येत होते वगैरे तक्रारी त्यांच्याकडं आल्या होत्या. फांद्या आमच्याही खिडकीजवळ येत असल्यानं ती बंद करायला सांगितली गेली. त्या माणसांच्या चाहुलीनं तो पक्षी केव्हाच आकाशी झेपावला होता... माझ्या डोळ्यांपुढं त्याचं ते खोड पोरखणं सतत येत होतं... तासाभरात त्या माणसांचं काम त्यांच्या लेखी फत्ते होऊन ती निघूनही गेली. बंद खिडकी मन घट्ट करून उघडली खरी... पण... त्या पक्ष्याची फांदी अर्धवट तुटली होती... किंवा फांदीवरच्या पक्ष्याचं मनच तुटलं होतं... झाडाच्या फांद्या झाडाखालीच विखुरल्या होत्या... त्या नेल्या जात होत्या... काही काळानं स्थिरावल्यासारखं झालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो यायच्या आधीच माझ्या मनात कालवाकालव होऊ लागली... त्याचं काय होईल... पक्ष्यांना मन असतं का... आपली फांदी पाहून त्याला काय वाटले वगैरे सतराशेसाठ विचार मनात डोकावू लागले... तितक्यात तोच डोकावला त्याच्या फांदीवरून... जणू क्षणभर त्यानं माझ्याकडं पाहिलं न पाहिलं असं आपलं मला भासलं... त्याचं टोचावलेल्या ढोलीच्या शोधात त्यानं पुष्कळ वेळ घालवला... नंतर त्याला बहुधा खरं काय ते कळलं असावं... काही क्षण तो तस्साच निश्चलपणं त्याच कुटभर उरलेल्या फांदीवर बसून राहिला नि मग उडून गेला.

नंतरच्या सकाळी आला खरा, पण उंबराशेजारच्या शेजारच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसलेला दिसला. त्याही झाडाची अवस्था उंबरापेक्षा निराळी नव्हती. पण त्याचा पसारा उंबराहून थोडा अधिक होता इतकंच... मग तिथल्या एका फांदीवर त्यानं जोमानं आपलं काम सुरू केलं... मनातल्या मनात मलाही किंचितसं हुश्श वाटलं... आता त्याच्याविषयी आणखीन माहिती जाणून घ्यावीशी वाटलं नि गुगलबाबाला सर्चलं... तेव्हा विकिपिडियाच्या आधारे कळलं हा तर तांबट होता. माहिती मिळाली ती अशी-   
तांबट महाराष्ट्रात प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. त्याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत म्हणतात. तो तांबूस रंगाचा आणि चिमणीच्या आकाराचा असतो. त्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर-खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात. त्याचा पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागं प्रमुख कारण म्हणजे या खोडांवर लाकूड पोखरणं त्यांना सोपं जातं. तांबट पक्षी या पोकळीचा घरटं म्हणून वापर करतो. तो शक्यतो एकटा किंवा जोडीनं  आढळतो. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ, उंबर अशा झाडांवर तो आढळतो. रसाळ फळं, फुलाच्या पाकळ्या आणि काही प्रमाणात कीटक हे त्याचं आवडतं खाणं आहे. हा अगदी सहज नजरेत येत नाही, कारण त्याच्या रंगामुळं तो हिरव्या झाडांमध्ये सहज दडून बसतो, पण उन्हाळ्यात त्याला शोधाणं थोडं सोपं जातं. पानगळीमुळं तो नजरेत येऊ शकतो पण हा पक्षी दिसण्याचं प्रमुख कारण तो तांब्याच्या भांड्यावर घाव घातल्यावर येणाऱ्या आवाजासारखा आवाज करून आपलं लक्ष वेधून घेतो.

पुष्कळदा दरवर्षी त्याच झाडावर पुन्हा नवीन घरटं कोरलं जातं. ही माहिती तर खरीच ठरली. ते वर्षं आणि आता पुढंही तांबट येतोच आहे उंबरावर... कदाचित तो नाही, त्याच्या पुढच्या पिढ्या असतील... माहिती नाही... कधीतरी आणखीन एक तांबटही येतो, पण तो पाहुण्या कलाकारासारखा वागतो. माहिती नाही... पण येण्याची वेळ तीच ती आहे. ती असोशी आहे, टोकत राहण्याची... खोड पोखरत राहण्याची... एकाग्रता आहे, सजगता आहे. ध्यास आहे, साधना आहे जणू ती त्या तांबटाची... आता दरवर्षी किमान एखादं तरी फोटोसेशन करते त्याचं. अर्थात तो काही त्याचं काम थांबवत नाही त्यासाठी. मग कधी व्हिडिओही होऊन जातो झक्कपैकी. रोज वाट पाहावी, त्याची पुन्हा नव्यानं. त्याच्यासारख्या अदम्य आशेनं, सकारात्मकतेच्या दिशेनं...  

 
(छायाचित्र- राधिका कुंटे)