Sunday, 3 September 2017

आठवण



`ती` गेली... `ती` गेली आणि पाच वर्षांपूर्वीच्या जखमेवर धरलेली किंचितशी खपली पुन्हा निघाली... की ती खपली धरलीच नव्हती प्रत्यक्षात... मनाच्या कुठल्याशा कोपऱ्या जखम आहेच भळाळती... दुःख आहेच वेटोळं घालून बसलेलं... विरह आहेच आपल्या माणसांचा... आपल्या जिवलागांचा... आताआत्ताच गेलेल्यांचा... काही वर्षांपूर्वी गेलेल्यांचा... अकाली गेलेल्यांचा... अकस्मात गेलेल्यांचा... वय झालं म्हणून गेलेल्यांचा किंवा एकूणच गेलेल्या सगळ्या सगळ्यांचा... आठव आहेच त्यांच्या स्मृतींचा... पिंगा घातला जातो अनेकदा आठवणींचा... डोंगर उपसले जातात क्षणा न क्षणांचे... सुखाची माती आणि दुःखाचे दगड... आनंदाचे ओढे आणि भावनांची झाडं... बहरतात, फुलतात, कोमेजतात, मान टाकतात... पुन्हा नव्यानं नवी नाती जन्मतात...

आठवणी झऱ्यासारख्या पाझरतात... भावनांना फुटतात कोंब... काळाचा सुटतो ताल... सलग सलग सरती चित्रे... पुरतो एक क्षण... धावत सुटते मन... वाऱ्याहून वेगात... ते कवळते असंख्य स्मृतींना... एक एक धागा गुंफतो... आठवणींचा रेशीम गोफ... मध्येच येतं वास्तवाचं भान... अन मनाला शोक अपार... विसरू म्हणता विसरेना... हाती काही गवसेना... मग जिणं होऊन जातं अधांतरी... तरी सल राहतोच अंतरी... दुःखाची बांधली जातात गाठोडी... लोटून दिली जातात मनात कुठंतरी... वाटतं गेली पार ती खोल खोल तळात...वाटतं की, दिसेनाशी झाली असतील मनाच्या समुद्रात... मग असं काही घडतं... मनसमुद्राचा ढवळला जातो तळ... तयार होतो एक भोवरा... गरगर गरगर... पुरता वेटोळून घेतो तो आपल्याला... चालते बाहेर येण्याची धडपड... कुणी चटकन सावरतं... कुणाला लागतो वेळ... कुणी वरवर असतं ठीक... कुणाचा कधीच बसत नाही मेळ...

पुन्हा भोवरा... पुन्हा बाहेर पडणं... पडणं आणि उभं राहाणं... गेलेल्यांनी हेच तर केलं असावं... त्यांचा कित्ता गिरवावा हे खरं... पण... पण कित्ता गिरवताना आठवणींचं रान फोफावेल का पुन्हा... पडेल का भावनांच्या वेलींचा विळखा... येण्या-जाण्याच्या घड्याळातील लंबकाची भूमिका बजावणारं आपलं आयुष्य... समजून घ्यावं का, त्यातलं इंद्रधनुष्य... ते पाहा, दिसतंय त्या तिकडं... मनातल्या आठवणींच्या डोहाच्या काठाशी... आजवरचे संस्कार, दिलेली शिकवण, जपलेली नाती, जोडलेली माणसं, समजुतीचा ठेवा, विद्येचं महत्त्व आणि माणूसकीचा वसा या सात गोष्टींचा वारसा आपसूकच लाभलेला असतो... तो जपणं हीच त्यांची आठवण ठरावी...



   

(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)

5 comments:

  1. खरंय, काही गोष्टी विसरण्यासाठी समयही खुजा पडतो.

    ReplyDelete
  2. खरंय, काही गोष्टी विसरण्यासाठी समयही खुजा पडतो.

    ReplyDelete
  3. आठवणीचा ज्वालामुखी पुन्हा छान मन हेलावुन गेला....
    एक तर आपण स्थितप्रज्ञ होणे फारच गरजेचे वाटते.
    असो फारच छान शब्दफुलांची ओंजळ...

    ReplyDelete