Sunday, 17 September 2017

पुर्नभेट




आणि अखेरीस आपण भेटलो... आठवतयं का तुला? आठवतेय का तुला, ती दोन वर्षांपूर्वीची भेट... http://shbdaphulanchi.blogspot.in/2015/05/blog-post_17.html कितीकिती अडीअडथळे पार करुन भेटलो होतो आपण. ऐन उन्हाळ्यातील एक सकाळ होती ती. कोवळ्या सूर्याच्या किरणांसोबत सुरु झालेला `ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाईज`... छानच रंगल्या होत्या आपल्या गप्पा... आणि आता या वेळचा योग जुळून आला थेट पावसाळ्यातलाच... आदल्या दिवसभर चक्क उन पडल होतं आणि रात्री बऱ्यापैकी पाऊस कोसळू लागला. वाटलं कसं काय भेटणार आपण? यावेळी एका ग्रुपसोबत यायचं होत बसमधून तुमच्याकडं. पण नशीब पावसानं उघडीप दिली आणि आम्ही तुमच्या घरी- `ओवळेकरवाडी`त पोहचलोदेखील...
 
खरंतर वाडीत पोहचल्यावर भारी फिलिंग होतं एकदम... भोवताल ओळखीचा तरीही अनओळखी वाटत होता... तुमच्याकडं यायच्या वाटेवरच्या चिखलातून वाट काढत काढत शेडमध्ये पोहचलो. तोपर्यंत जणू पावसानं एक मोठ्ठा पॉज घेतला होता. मग तो पुन्हा कोसळायला लागला. मग फुलपाखरं, त्यांचं लाईफ, त्यांची लाडकी झाडं वगैरे माहिती मिळवली, खरंतर शास्त्रीय माहिती गेल्या वेळीही मिळालेली, खरी उत्सुकता होती तुम्हाला भेटण्याची... ते `फुलपाखरी क्षण` अनुभवण्याची... बाहेर पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसू लागली. तितक्यात एक नवजात फुलपाखरू त्याच्या कोशातून बाहेर आलं आणि त्यानं पंख पसरले नि क्षणभर भिरभिरलं आणि चटकन शेडबाहेर उडून गेलं. आम्हीही ते निमित्त साधून बाहेर पडलो. तर ते बाहेरच्याच झाडावर निवांत मुक्काम ठोकून बसलेलं. मग काय, धडाधड फोटो नि व्हिडियो शुट सुरु झालं, जे निघेपर्यंत चालूच होतं...

ये टाईम मेरे पास बडा लेन्सवाला कॅमेरा था। बारिश फिर से रुकावट लिये हमें खेद है, ऐसाही बोल रही थी। गिर रहीं थी, रुक रहीं थी। फिर भी हम लोग थोडा घुमे। कुछ कुछ बटरफ्लाय देखे हमने। बच्चे लोग खरगोश के साथ खुश हो गये थे। बटरफ्लाय कहॉं रहते है, जैसे कई सवाल बच्चोंने किए और उनके जबाब मिल गये। फिरुन फिरुन थकल्यावर शेडमध्ये परतलो. पावसाचा थोडासा राग आला होताच. पण पुढ्यात आलेल्या टेस्टी मिसळ पावच्या चवीनं राग पळून गेला. या ट्रेल निमित्तानं बच्चे कंपनीशी चार तासांची दोस्ती झाली. त्याचा स्मार्टनेस, टेक्नोसॅव्हीनेस नि हजरजबाबीपणा हे गुण घेण्यासारखे होते. शेअरिंग-केअरिंगचे धडे तर आम्ही सगळ्यांनीच गिरवले. फुलपाखरं नि त्यांचे `फुलपाखरी क्षण` क्षणभर सोडवत नव्हते. पण परतणं भागच होतं. मग पुन्हा पुन्हा मागं वळून बसमध्ये बसलो. परतीच्या वाटेला लागलो. पाऊस सुरु झाला. पुन्हा... खराखुरा... आणि `फुलपाखरी क्षणां`च्या आठवणींचाही... आता पुर्नभेटीपर्यंत हा पाऊस कोसळत नव्हे, भिरभिरतच राहिल... कदाचित अगदीच एकटं वाटू नये, म्हणून मग फुलपाखरं आलटूनपालटून येतात हो तशी थेट घरच्या गॅलरीतल्या फुलांवर सेकंदभरांच्या हवाई भेटीला...  एकूणात भिरभिरणं चालूच राहातं... त्यांचं आणि आपल्या मनाचंही...



छायाचित्र- राधिका कुंटे

      

Sunday, 3 September 2017

आठवण



`ती` गेली... `ती` गेली आणि पाच वर्षांपूर्वीच्या जखमेवर धरलेली किंचितशी खपली पुन्हा निघाली... की ती खपली धरलीच नव्हती प्रत्यक्षात... मनाच्या कुठल्याशा कोपऱ्या जखम आहेच भळाळती... दुःख आहेच वेटोळं घालून बसलेलं... विरह आहेच आपल्या माणसांचा... आपल्या जिवलागांचा... आताआत्ताच गेलेल्यांचा... काही वर्षांपूर्वी गेलेल्यांचा... अकाली गेलेल्यांचा... अकस्मात गेलेल्यांचा... वय झालं म्हणून गेलेल्यांचा किंवा एकूणच गेलेल्या सगळ्या सगळ्यांचा... आठव आहेच त्यांच्या स्मृतींचा... पिंगा घातला जातो अनेकदा आठवणींचा... डोंगर उपसले जातात क्षणा न क्षणांचे... सुखाची माती आणि दुःखाचे दगड... आनंदाचे ओढे आणि भावनांची झाडं... बहरतात, फुलतात, कोमेजतात, मान टाकतात... पुन्हा नव्यानं नवी नाती जन्मतात...

आठवणी झऱ्यासारख्या पाझरतात... भावनांना फुटतात कोंब... काळाचा सुटतो ताल... सलग सलग सरती चित्रे... पुरतो एक क्षण... धावत सुटते मन... वाऱ्याहून वेगात... ते कवळते असंख्य स्मृतींना... एक एक धागा गुंफतो... आठवणींचा रेशीम गोफ... मध्येच येतं वास्तवाचं भान... अन मनाला शोक अपार... विसरू म्हणता विसरेना... हाती काही गवसेना... मग जिणं होऊन जातं अधांतरी... तरी सल राहतोच अंतरी... दुःखाची बांधली जातात गाठोडी... लोटून दिली जातात मनात कुठंतरी... वाटतं गेली पार ती खोल खोल तळात...वाटतं की, दिसेनाशी झाली असतील मनाच्या समुद्रात... मग असं काही घडतं... मनसमुद्राचा ढवळला जातो तळ... तयार होतो एक भोवरा... गरगर गरगर... पुरता वेटोळून घेतो तो आपल्याला... चालते बाहेर येण्याची धडपड... कुणी चटकन सावरतं... कुणाला लागतो वेळ... कुणी वरवर असतं ठीक... कुणाचा कधीच बसत नाही मेळ...

पुन्हा भोवरा... पुन्हा बाहेर पडणं... पडणं आणि उभं राहाणं... गेलेल्यांनी हेच तर केलं असावं... त्यांचा कित्ता गिरवावा हे खरं... पण... पण कित्ता गिरवताना आठवणींचं रान फोफावेल का पुन्हा... पडेल का भावनांच्या वेलींचा विळखा... येण्या-जाण्याच्या घड्याळातील लंबकाची भूमिका बजावणारं आपलं आयुष्य... समजून घ्यावं का, त्यातलं इंद्रधनुष्य... ते पाहा, दिसतंय त्या तिकडं... मनातल्या आठवणींच्या डोहाच्या काठाशी... आजवरचे संस्कार, दिलेली शिकवण, जपलेली नाती, जोडलेली माणसं, समजुतीचा ठेवा, विद्येचं महत्त्व आणि माणूसकीचा वसा या सात गोष्टींचा वारसा आपसूकच लाभलेला असतो... तो जपणं हीच त्यांची आठवण ठरावी...



   

(छायाचित्रं – इंटरनेटवरून साभार.)