`तो` माझा `सांगाती`
क्लिक...
क्लिक... अगदी अस्साच नाही, पण काही अंशी असा आवाज किंवा तत्सम क्रिया आपल्या
भोवताली किंवा अगदी आपल्याच हातात सर्रासपणं घडते. तो तो क्षण हमखासपणं टिपून
ठेवला जातो... एकदम स्मार्टली... `छोटी छोटी बातें` एकदम परफेक्टली
कॅच होतात त्याच्यात. `टिपणं` या
शब्दाच्या साऱ्या छटा या यंत्रानं आत्मसात केल्यात असं म्हटल्यास ते वावगं ठरणार
नाही. काळा पडदा डोक्यावर पांघरून नाना हिमकती साधत काढलेल्या `फोटू`पासून ते लेटेस्ट स्मार्टफोनमधल्या
कॅमेऱ्याच्या सेटिंग्जच्या साहाय्यानं एका क्लिकसरशी काढलेला `पिक` हा साराच प्रवास फारफार अवाढव्य क्षणांना वेढून
उरणारा आहे. कॅमेऱ्याच्या क्रांतीतले बदल आणि तांत्रिक बाजू वगैरे सांगण्याच्या फंदात
पडणार नाहीये. पण कॅमेऱ्याबद्दल काही नक्कीच शेअर करता येईल, असं वाटतंय...
`त्याची` नि माझी ओळख झाली लहानपणीच. रोलवाला कॅमेरा
होता तेव्हा आमच्याकडं. बाबाची हौशी फोटोग्राफी फार चालायची तेव्हा. बाबानं ``अशी उभी राहा, तशी उभी राहा`` म्हटल्यावर तसं करायचं
एवढंच माहिती होतं. मग त्यासाठी उन्हातान्हातलं बागेत जाणं असो किंवा गच्चीत जाऊन फोटो
काढणं असो... त्या सांगण्याचं पुढं काय होतं, ते समजून घ्यायची उत्सुकता नव्हती...
कदाचित तो त्या वयाचा फॅक्टर असेल, नंतर खेळायच्या खेळाकडं ध्यान असेल... किंवा
कदाचित आजच्यासारखा लगेच फोटो दिसला असता तर तो पाहिलाही असता... तेव्हा फोटो डेव्हलप
होऊन हाती पडेपर्यंत वाट पाहायला लागायची. काही काळानं कुठंकुठं फिरायला गेल्यावर
मीपण फोटो काढते, असा लग्गा लावायला लागले नि तसे काही फोटो काढलेही... फुलांचे-पानांचे,
आई-बाबाचे वगैरे वगैरे... तरीही ते हाती पडल्यावर ``हा मी
काढला, हा मी काढला`` इतकंच बाकीच्यांना सांगून अल्बम कपाटात
रवाना होई.
पुढं
अभ्यासाच्या नादात कॅमेरा बाजूलाच पडला. शब्दांचं वेड वाढत गेलं... वाचन नि
काहीबाही लेखन वगैरे वगैरे... अर्थात ते अजून कायम आहेच. पण मग कुठेसं फिरायला
गेलो होतो तर काकाचा कॅमेरा उसनापासना आणून फोटो काढले आणि पुन्हा एकदा त्या फोटो
काढण्यातली मज्जा नव्यानं समजली. मग त्याच नादात एका टप्प्यावर घेतला कोडॅकचा
डिजिटल कॅमेरा. हा कॅमेरा हाती आल्यावर भटकणं वाढलं किंवा मग भटकत होते नि कॅमेरा
हाती होता... बऱ्याचदा एकटीनं, घरच्यांसोबत, मैत्रिणींसोबत, बहिणीसोबत, भावासोबत,
मित्रमंडळींसोबत काहीबाही टिपत राहिले... मधल्या काळात साधा फोन गायब होऊन हातात
आला स्मार्टफोन. पहिला, दुसरा... असं होतं ते मोजणं केव्हाच मागं पडलं...
कॅमेऱ्याचे फंक्शन्स कसे नि किती आहेत, ते पहिल्यांदा बघून मग फोन घेतला जाऊ
लागला. कोडॅकचा डिजिकॅम बाबा आदमच्या जमान्यातला होऊन गेला... कोपऱ्यात पडून
राहिला बिचारा... मध्यंतरी घरातल्या आवराआवरीत बाबाचा एक जुना कॅमेरा सापडला. मग
त्यानं काही दिवस अँण्टिक पीस म्हणून टिव्हीशेजारची जागा पटकावली होती. त्याचे फोटोग्राफी
डेला फोटो काढले गेले, अर्थात स्मार्ट फोन कॅमेऱ्यानं...
आताशा हा
स्मार्टफोनवरचा कॅमेरा चिक्कार भाव खातोय. त्यातही निसर्ग आणि खादाडीसह बाकीच्या
गोष्टी टिपून देतोय. मग एका मित्रानं नावही बहाल करून टाकलं `फुलवेडी` वगैरे... तर आताचा हा कॅमेरा येता-जाता, हवं ते हवं तेव्हा हवं तस्सं
टिपून घेतोय. मग त्यातलेच काही सोशल मिडियावर, ब्लॉगसाठी अपलोड केले जातात... तेही
एक यक्षप्रश्न शिल्लकीत आहेच की, फोटो अपलोड करावेत की नाहीत... काही अपलोड केले
जातात, काही अपलोड होत नाहीत... किंवा मग काही तस्सेच थेट लॅपटॉपच्या फोल्डर्समध्ये
रवाना होतात... शिवाय अलीकडची कॉपी-पेस्ट संस्कृती लक्षात घेऊन त्या फोटोंवर नाव
लिहावं लागतं... नाईलाजानं... काही वेळा फोटोंना दाद मिळते, भरभरून... ते ठीक आहे.
माणसं दाद देतात, फोटो पाहातायत, असं वाटतं एकीकडं... पण... पण ते खरंच खरं असतं
की, केवळ `क्लिकलेला` असतो लाईक,
हार्टचा पर्याय... काही कळत नाही बुवा कधीकधी... बरं, ही प्रतिक्रिया फोटो
काढण्याच्या कौशल्याला असते की, त्या फोटोच्या विषयाला असते की दोन्हीला की, आपलं
फक्त `क्लिकायचं` म्हणून क्लिकायचं... शप्पथ...
आपल्याला प्रश्न तर फार पडतात राव... म्हणून तर हे असं शब्दांतून व्यक्त व्हावं
लागतं... पण काही वेळा त्याहूनही अधिक-उणं उरतंच... ते कॅमेऱ्यात टिपायची धडपड
होते... तरीही या दोन्ही माध्यमांतून निसटूनही असंख्य गोष्टींचं अस्तित्व
जाणवतंच... ते कशानं टिपावं, कसं तुमच्याशी शेअर करावं... हा प्रश्न पुन्हा उरतोच... या घडीला शांताबाईच्या
ओळींचा संदर्भ आठवतोय, ``क्षण दिपती, क्षण लपती...`` हे तेवढं खरंए... ते कसं काय टिपावं बुवा?... ते
टिपणं साधलं पाहिजे नाही का?... कदाचित केव्हा तरी कधी तरी या प्रश्नाचं उत्तर
मिळेलही... तेव्हा बोलूच...
छायाचित्र
– इंटरनेटवरून साभार.