शोध(लाग)लेला सेल्फी
...आणि आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं
महत्त्वाचं...
शहराची हद्द सोडणं महत्त्वाचं... थोडासा वेळ
डोंगरदऱ्यांत घालवणं महत्त्वाचं...
तर पेट्रोल-डिझेलचे टिपकल वास नाकाशी घोंगावत
असतानाच, आली गार वाऱ्याची झुळूक...
एसी नव्हेच बिल्कुल... तोच तो समस्तांना
सुखावणारा वारा नि सोबत त्याची झुळूक...
मग हातातला मोबाईल पर्समध्ये टाकून दिला खुशाल...
होताहेत `अपडेट` त्यांना, होऊ द्या हुशार...
राहू दे, आजचा दिवस आम्हांला `ढ`...
गिरवू दे, हिरवी आणि मातकट मुळाक्षरं...
निसर्गाच्या कॅनव्हासवर वसंत ऋतूचा वॉश दिला
गेलाय...
घरोघरच्या मातीच्या चुली वेगळ्या नि इथल्या मैलो
न मैल पसरलेल्या मातीचा पसारा निराळा...
``वेलकम`` म्हणत झाडं
तऱ्हतऱ्हांच्या शेडचे ड्रेस घालून घोळक्यानं स्वागताला उभी...
पोपटी, गडद हिरवा, मातकट हिरवा, तपकिरी हिरवा,
सोनसळी, पिवळट, पालवलेली आणि...
आणि काही तर अगदी तटस्थच... निष्पर्ण... पण
त्यातही आपलं ``झाडपण वागवणारी``...
मग आपसूकच हे ``झाडपण`` आपल्याला झपाटून टाकतं... भोवताली हीच सगळी
मंडळी असतात काही तास आपल्या...
मग ही झाडं-पानं, डोंगर-माती आणि आपण थोडंसं
एकजीव होऊ लागतो...
झाडांवरची लाल, गुलाबी, शेंदरी, पिवळी, केशरी,
पांढरी फुलांची श्रीमंती आपल्याला खुणावू लागते...
काही काळासाठी मग बाजूला ठेवलेला मोबाईल हातात
येतो नि काहींना आपल्या कॅमेऱ्यात `क्लिकतो`... कुणाला `व्हिडिओतो`...
तरीही यातून काहीतरी उरतंच...
आपल्यातून आपसूकच फुटते एक पालवी...
ती असते कल्पनेची...
कल्पनेला धुमारे फुटायच्या आत आपण पोहचलेलो असतो
मुक्कामी...
पाहुणचार, गप्पागोष्टी, कामंधामं अशा भौतिक
जगातल्या गोष्टी आपण करतो...
भोवतालच्यांना कल्पना येत नाही, पण आपल्या
डोक्यात काहीतरी खदखदत असतं...
रटरटत असतं... थोडंसं ओसंडत असतं... क्षणभराची
तंद्रीही लागते...
मग कुणीतरी पुन्हा आपल्याला भोवताच्या भौतिक जगात
ओढून घेतं...
...आणि आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं
महत्त्वाचं...
तर मग सुरू होतो परतीचा प्रवास...
या बिंदूपर्यंत थांबलेला त्या बिंदूपर्यंतचा...
पुन्हा एकदा येते वाऱ्याची झुळूक...
पुन्हा हाय-हॅलो करते `निसर्गाई`...
आता मात्र क्षणभर अपडेट व्हायची निकड लागते
भासू...
ऑन होतो मोबाईल नि होतो नेटपॅकचा खात्मा...
तितक्यातच डाऊन होते बॅटरी...
आणि काहीशा आनंदानंच आपण पुन्हा सामावतो त्या
निसर्गाच्या समष्टीत...
कललेला सूर्य, वाकुल्या दाखवणाऱ्या सावल्या...
झपाझप मागं पडणारा घाटरस्ता...
टनेलमधल्या क्षणिक अंधाऱ्या क्षणांमध्ये सामोरा
आला उजेड-अंधाराच्या पाठशिवणीचा खेळ...
आशा-निराशा, आनंद-दुःख आणि उत्साह-हताशा या चुलत
भावंडांची जणू एक साखळी...
तितक्यात आला हायवे संपल्याचा बोर्ड... झाडांची
रांग मागं पडलेली...
होऊ लागलं ट्रॅफिक जॅम... सिग्नलवरचे चिमुरडे
रडवेले बोल... ``अब मैं किस की गोदी में खेलूँ???...``
ते वाक्य डोक्यात शिरेपर्यंत गाडी सरकली पुढं...
घर आलंच...
...आणि
आणखी एकदा एक प्रवास...
प्रवास कुठला, कधीचा, कुणाचा, कशासाठी...
हे बोचकारणारे प्रश्न नकोत... प्रवास होणं
महत्त्वाचं...
तर प्रवास होणं महत्त्वाचं... `स्व`चा शोध घणं
महत्त्वाचं...
छायाचित्रे – राधिका कुंटे