रंगयात्री...
गरगरते पंखे, घरघरते एसी
आणि हाश्शsssहुश्शss म्हणणारी माणसं... दर उन्हाळ्यातलं कॉमन
चित्र. ही उन्हाची तलाखी वाढतच जाणारेय. दुपारच्या वेळी स्माईलवाला गॉगल लावलेला
सूर्य अधिकाधिक रुसून बसणारेय. भोवतालच्या आसमंताला जणू उन्हाच्या पिवळ्या रंगाचाच
वॉश दिला गेलाय, असला काहीसा फिल आपल्याला येऊ लागतो. मग आणखीनच उकडायला लागतं नि
जीव कासाविस होऊन जातो... कबूल आहे, हे सगळं होतंच, पण आपल्याला फारच रखरखीत नि
भगभगीत वाटणाऱ्या या सगळ्या वातावरणातून थोडंसं तरी `बाहेर` यायला हवं. `अगदी बाहेरच`
म्हणतेय मी. कारण पंखा किंवा एसीच्या थंडाव्यापेक्षा एखाद्या झाडाच्या सावलीत
मिळणारा गारवा लई भारी असतो. फक्त त्यासाठी थोडंसं रुटिनपलिकडं डोकवायला हवं.
प्रयत्नपूर्वक शोधावेत निसर्गातले रंगयात्री...
फार काही दूर देशी जायची
गरज बिल्कुल नाहीये. आपल्याच आसपास एक नजर टाका की जरा. काही झाडांची पानगळ होऊन
त्यांना नवीन पालवी फुटत्येयही. त्यामुळं हिरव्या-पोपटी रंगांच्या न्याऱ्या शेडस्
जागोजागी दिसू लागल्यात. शहरात राहात असाल तर तुमच्या परिसरातले, रस्त्यांलगतचे
देशी बदाम, गुलमोहर, सोनमोहोर, पालवायला लागलेत. थोडीशी तसदी घेऊन, किंचित वाट
वाकडी करून गेलात तर काटेसावर, पांगारा आणि बहाव्याला फुलं येऊ लागल्येत. त्या
फुलांचे लाल-गुलाबी-पिवळेधम्मक रंग लुभावणारे आहेत. कुसुंबाच्या झाडाची लाल-हिरवी
पानं हॅलो म्हणताहेत. पिंपळाला पालवी फुटतेय. पळसाची `भाषिक पानं
तीनच` असली तरी तोही फुलतोय... लेटलतीफ सागाची मात्र पानगळ सुरू
होतेय. त्याला जवळजवळ मेअखेरीस पानं येतील... चैत्राची चाहूल देणारं कोकिळ कूंजन कानी
पडू लागलंय. शिंपी, तांबट पक्षी झाडांवर आपली हजेरी लावताहेत. हळद्याची पिसं
पिवळीजर्द होताहेत. कित्येक फुलपाखरं भिरभिरताहेत... हे आहेत निसर्गातले रंगयात्री...
काळा आणि पांढरा या
रंगांच्या मधल्या भव्य पटावर निसर्गाच्या रंगांची उधळण सुरू आहे. कारण, ही रंगांची
दुनिया, आगळीच किमया. विलोभनीय सृष्टी, नित्यनूतन दृष्टी. हा तांबडा भडकदार,
पावित्र्याचा रखवालदार. आकाशाची निळाई, सूर्याची केशरी झिलाई. दिसे रसरसता पिवळा,
चटकदार असे जांभळा. की गडद हवा हिरवा, घुमतसे सदा पारवा. सृष्टी रंगविभोर झाली, सप्तरंगाची
दाटी जमली... ही एवढी किमया भोवतालच्या निसर्गात घडतेय, तरीही एक हुरहुर मनाला
लागून राहिलेय... एका अस्वस्थतेची किनार वेढून राहिलेय... अनेक भागांत दुष्काळ
समोर उभा ठाकलाय... शेती करपतेय... शेतकऱ्यांवरच्या आणि पर्यायानं आपल्या सगळ्यांवरच्या
संकटांच्या चाहुलीची... त्यासाठी पारंपरिक होळी आणि रंगपंचमीचा वसा बदलायला हवा.
वृक्षतोड थांबवायलाच हवी. पाण्याचा अक्षम्य अपव्यय आणि रंगानं रंगणं थांबायलाच
हवं. त्यापेक्षा त्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम गरजूंना द्यायला हवी. पर्यावरणपूरक
वातावरण निर्माण करण्यासाठी झटायला हवं... आपापला खारीचा वाटा उचलला गेला, तर
संकटांचा डोंगर पार करणं तुलनेनं सोपं जाऊ शकतं... निसर्गातल्या चैतन्यदायी सेलिब्रेशनची
ओळख पटली की निसर्गाशी आपली नकळत मैत्री होते. जपायला हवं मनात उमटणाऱ्या
संवेदनांना... निसर्गातल्या चैतन्याच्या खुणा सगळ्यांनी जपायला हव्यात. त्यासाठी व्हायला
हवं, निसर्गातले रंगयात्री...
छायाचित्र – राधिका कुंटे