Monday, 14 October 2019


वाचणं... जगणं...

मी, तू, तुम्ही, आपण. आपण मिळून सारेजण; असं गृहित धरलं तर आपलं वाचणं आणि आपलं जगणं या दोन गोष्टींचा हिशेब शेजारशेजारी मांडून पाहिला तर कसा दिसतो हा जमाखर्च? आपण घरात असतो, घराबाहेर असतो. आपण आपल्यात असतो, आपण दुसऱ्यात असतो. आपण निसर्गात असतो, आपण शहरीकरणात असतो. माणसांच्या समुद्राची गाज आपल्यावर सतत आदळत असते. कधी ऐन गर्दीतही आपण एकटेपणाच्या बेटावर राहात असतो. कधी मनानं, कधी शरीरानं आपण कुठंकुठं असतो आणि कुठंकुठं नसतोही. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं नि जगणं या म्हटलं तर दोन समांतर गोष्टी का हो?... कारण बहुतांशी लोक्स कथा-कादंबऱ्या, ललित-कविता असं काहीबाहीच जास्त वाचतात. आपल्या प्रत्येकाची आयुष्यं तरी या साहित्य प्रकारांहून काही निराळी असतात. बहुधा नसावीत. क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी काही वेळा कहानी में असा ट्विस्ट आणतात की, पुछोही मत! पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं नि जगणं या दोन्ही मुद्द्यांचा किस फार पूर्वीपासून चालत आलेला दिसतो. मग तो जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा ज्येष्ठ साहित्यिक खांडेकर-फडके यांचा वाद असो किंवा श्लील-अश्लील लिखाण असो किंवा बेफाम वक्तव्यांनी भरलेले चरित्र किंवा तोलूनमापून लिहिलेलं आत्मचरित्र.... म्हटलं तर या सगळ्याच मुद्द्यांचं प्रतिबिंब आपल्या जगण्यात अनेकदा पडलेलं दिसतं. मग त्यावरून होणारी चहाच्या किंवा क्वचित कॉफीच्या पेल्यातली वादळ कधी लवकर शमतात, तर कधी फार रेंगाळतात. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं या गोष्टी हातात हात घालून चालत असाव्यात जणू, असं वाटावं इतकं काहीजण वाचतात आणि जगतातही. प्रत्येक पुस्तकात काही ना काही गवसेल असं नाही, पण काही पुस्तकं मात्र प्रेरणा, विचार, प्रोत्साहन, आनंद, उर्जा आणि भरूभरून देणारी असतात, फक्त ते घ्यायला आपण तत्पर असलं पाहिजे. मात्र त्याचा अतिरेक होऊन पु.लं.च्या सखाराम गटणेसारखी स्थिती होऊनही उपयोगाचं नाही. वाचलेल्या शब्दांचं, त्यातल्या अर्थाचं आणि विचारांचं धन जपून वापरणं, त्यावर चिंतन-मनन करणं गरजेचं ठरतं. ते प्रत्यक्ष आचरणात आणणं आणि तसं कायम वागणं हे आणखी पुढचे टप्पे झाले. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं या दोन गोष्टींबद्दल लिहायचं म्हटलं खरं, पण वाचन म्हणजे नेमकं काय, ते कसं, कुणी, किती, कधी, का करावं हा खरंतर निराळ्या लेखाचा विषय होईल. पण काहींना वाचणं म्हणजे अगदी नकोनकोशी गोष्ट वाटते. हो, खऱ्या वाचनप्रेमींना हे सहन होणार नाही, पण वाचणं न आवडणारीही माणसं आहेत. असू शकतात. असतातही. ती वाचत नाहीत. रोजचा पेपर वाचला तरी डोक्यावरून पाणी... पण तरीही त्यांच्या मते त्यांचं काहीही अडत नाही. पण मग त्यांची हजारो कल्पना नि त्यांची पणतवंडं आणि लाखो विचार नि त्यांची नातवंडं यांच्याशी भेटच घडत नाही. त्यादृष्टीनं ते अपुरे राहतात. अर्थात हे वाचनप्रेमीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर. कारण त्यांचं काहीही अडत नसावं... पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर वाचणं आणि जगणं म्हणजे `जगणं नि वाचणं की वाचून जगणं नि जगून वाचणं...` असं शेरोशायरीत शोभेल असा किंवा हायकूत रुजलेला विचार मनात आला, तेव्हा या लेखाचं बीज मनात रुजलं. खरंतर काहीबाही वाचलं म्हणून काहीबाही लिहिता येत असावं माणसाला. कारण आपण वाचत असलेलं बहुतांशी वेळा कुणीतरी लिहिलेलं असतं. ते वाचून आपल्यालाही वाटू लागतं की आपणही काळ्यावर पांढरं करावं काहीतरी. त्याच नादात वाचत राहिलं जातं. जगणं होत राहातं. कधीतरी जमेल आपल्यालाही लिहिणं असं मनात घोकलं जातं. काळ पुढं सरकत राहातो. पण हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही...

खरंतर आता वाचणं हेच जगणं झालेलं असतं. शब्दांनी आपल्याला झपाटलेलं असतं. `अक्षरांचा श्रम जाहला` म्हणत आपण नाना पुस्तकांना भेटतो. कधी उराउरी, कधी आदरानं, कधी थोडं अंतर ठेवून तर कधी मोकळा संवाद साधून... त्या पुस्तकांतले विचार, त्यातलं विश्व, त्यातली शब्दकळा, त्याची धाटणी, त्यातली शैली अशा भारंभार गोष्टींची सांगड मनाच्या कोपऱ्यात घालणं चालू असतं. मेंदू भवतलातल्या गोष्टी टिपून घेत असतो, त्यांचं निवड-टिपण करत असतो... आणि तो क्षण उवचितपणं उगवतोच... शब्दाला फुटते पालवी... विचारांला लागे लोभवी... झरझर लिहितो होतो आपण... `आपण लिहितोय` हे फिलिंगच जाम भारी वाटतं. मग त्या पहिल्यावहिल्या लिखाणाचं कौतुक होतं. त्यानंतरही आपण लिहितो, वाचतो आणि वाचतो, लिहितो... काळ पुढंपुढं सरकत राहातो. हे सगळं असलं तरी आपलं जगणं चालूच असतं, कारण आपण असतो नि नसतोही... कारण आपण नाही वाचत नि वाचतोही... अशा वेळी वाचणं जगणं होतं, लिहिणं जगणं होतं, जगणं वाचणं होतं, जगणं लिहिणं होतं... वाचाल तर जगाल, जगाल तर वाचाल. वाचत राहा, जगत राहा.

- 


फोटो - इंटरनेटवरून साभार.