Saturday, 31 March 2018


पालवी


नमस्कार मंडळी. शतक महोत्सवी पोस्ट लिहिल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी आपण संवाद साधतोय. खरंतर हे ब्लॉगलेखन ही एक प्रकारे विचारांना फुटलेली पालवी मानावी का? वाचन, चिंतन, मनन आणि लेखन यामुळं कसदार झालेल्या मेंदूच्या जमिनीत इतर व्यावहारिक जगापल्याडच्या कल्पनांची बीजं रुजत असावीत. मग त्या अंकुरत असाव्यात, त्यांना इवलाली शब्दांची पानं फुटत असावीत आणि हळूहळू त्यांचा विस्तार होत ते रोपटं होत असावं. किंवा मग कधी मूळ झाडाचीच पानगळ होत असावी आणि त्यानंतर त्याला पालवी फुटत असावी.

ही पालवी कोणत्या प्रकारानं फुटलेली असेना ती वाढते, बहरते आणि त्यातून पुन्हा एकदा पालवतात कल्पना... त्यांना धुमारे फुटतात ते विचारांचे. हे विचारही शेकडो तऱ्हांचे असतात... एकासारखा दुसरा नाही आणि तिसऱ्यासारखा चौथा नाहीच... बरं हे विचार करणं थांबवता येतं का... नाय, नो, नेव्हर... म्हणा तसं करूही नये. कारण मुद्दलात विचार करणं, ही गोष्ट अलीकडं एखाद्या आश्चर्याकडं पाहिल्यागत ऐकली-पाहिली जाते. बरं तर बरं नुस्तं विचार करून भागतं, अशातला भाग नाही. तर विचार करून तो आचारात आणावा लागतो. नाहीतर मग `मुंगेरीलाल के हसिन सपनें`सारखे किस्सेच घडत राहातात. एक वेळ मुंगेरीलालचं हे स्वप्न पाहाणंही परवडत कारण निदान तो तेवढं तरी करतो. पण काही वेळा नुसतंच विचार करणं होतं. फक्त समाजमाध्यमांवर ढग काढले जातात किंवा पोस्टलं जातं त्या त्या वेळेपुरतं. मग हे त्या त्या वेळचं मत असतं, विचार असतात की भूमिका असते एखादी... कदाचित जाणूनबुजून घेतलेली. कदाचित उगीचच आव आणलेली किंवा कदाचित खरोखरच काहीच खरंच माहिती नसतं.

सखोल विचारांची पालवी ठामपणं बहणारी असते. सत्याचा जयघोष करणारी असते. सुसंस्कृतपणानं कलांचं कौतुक करणारी असते. समाजाप्रती आपली कृतज्ञता अल्प-स्वल्प स्वरुपात का होईना, व्यक्त करणारी असते. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी असते. विचारांना विचारांनी फुटलेला माणूसपणाचा सकारात्मक बहर पुन्हा जगवणारी असते. ``जगात नक्कीच काही चांगल्या गोष्टी घडत असाव्यात, नाहीतर इतकी फुलं फुलली नसती,`` अशी पोस्ट नुकतीच संगीतकार मिलिंद जोशी यांनी केली होती. त्यांच्या मताचा विचार करायचा झाला तर नक्कीच चांगुलपणाला पालवी फुटल्यावर काही चांगल्या गोष्टी घडत असतील आणि त्या आनंदात फुलं फुलत असतील. झाडाची पानगळ अपरिहार्य आहे, तसंच त्याचं पुन्हा पालवणंही अपरिहार्य आहे. तसं झाल्यावर सुखदुःखाच्या फांद्यांना सतत आशेची पालवी फुटते. फक्त त्या पालवीची काळ-वेळ आपल्याला पक्की ठाऊक नसते. पण ही पालवी फुटणार हा दुर्दम्य आत्मविश्वास असतोच. म्हणून मग पालवी पिंपळालाही फुटते, फुलझाडांनाही फुटते आणि मनामनातल्या विचारांनाही... विचारांची पानगळ नि विचारांचं पालवणं आणि शब्दांनी तो अर्थ वागवणं हे ओघानं येतंच. त्यानंतर पुन्हा पालवी फुटते, वाढते. बहरते आणि विचारांची झाडं फोफावतात...  फोफावत राहातात...


 (सर्व छायाचित्रं – राधिका कुंटे.)