बाप्पा मोरया रे...
`तो` येतोय आपल्याकडं... काहींकडं `त्याचं` आगमन झालंही असेल तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा... सगळीकडं `त्याचा` विचार नि `त्याचा`च विहार. `त्याच्या`साठी
प्रसाद नि फुले. `त्याच्या` गुणांचेच
भजन-कीर्तन. `त्याचे`च फोटो नि `त्याच्या`चसोबतचे सेल्फीसुद्धा. `त्याच्या`च निमित्तानं दिले जाणारे सामाजिक संदेश नि
सामाजिक बांधिलकीचे दाखलेही... `त्याच्या` आगमनानं भारावलेला भवताल. `त्याच्या` उत्सवाच्या निमित्तानं आपापल्या सो कॉल्ड `बिझी
लाईफ`मधून वेळात वेळ काढून माणसं भेटतात. उभ्या उभ्या का
होईना चार संवादांचे क्षण पदरी पडतात. ती शिदोरी बहुधा वर्षभर पुरत असावी...
`त्याच्या` येण्याच्या निमित्तानं मीही काहीबाही लिहित राहाते. फोटोबिटो काढत
राहाते. पोस्टत राहाते. `त्याच्या`
विविध माध्यमांतल्या आणि अनेकविध भाव दर्शवणाऱ्या मुद्रांचं संकलन करते. कॅमेऱ्याच्या
माध्यमातून `त्याला` टिपून `त्याला` जाणून घ्यायचा प्रयत्न करते. कधी `तो` नातलगांच्या सोसायटीजवळच्या देवळातला असतो. कधी
बातमीदारीसाठी कला महाविद्यालयातल्या होतकरू कलाकारांच्या हातांमधल्या कलेत `तो` विसावलेला असतो. कधी विसाव्यासाठी गेलेल्या
रिसॉर्टवरच्या परिसरात ठायीठायी दिसतो. किंवा कधी एखाद्या स्वामीनारायण मंदिराच्या
कलाकुसर केलेल्या खांबात `तो` सुबकपणं
कोरलेला असतो. कधी समाजमाध्यमातल्या फॉरवर्डेड फोटोंमध्ये तर कधी एखाद्या
ग्रुपमधून अचानक भेटीस येतो. कधी एखाद्या प्रदर्शनातल्या स्टॉलवर विराजमान असतो.
किंवा कधी काळांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संगतीत `त्याचं` अनादी रुप पुन्हा प्रत्ययास येतं. कधी
काळाघोडा फेस्टिव्हलमधल्या कलाकृतीच्या माध्यमातून `त्याची` मुद्रा प्रतीत होते. तर कधी स्वतःच रेखाटलेल्या कलाकृतीतून `तो` गवसू पाहातो...
`त्याच्या` या साऱ्या भावमुद्रा पुन्हा पुन्हा न्याहाळताना वाटतं की, `त्याची` बुद्धी, शक्ती, पालकांप्रतीचा आदरभाव,
बंधूप्रेम, `त्याचा` नेतृत्वगुण, `त्याचा` समोरच्याला समजून नि ऐकून घेण्याचा स्वभाव,
संकटांशी झुंजण्याची वृत्ती आणि `त्याच्या` मुखावर `चित्ती असो द्यावे समाधान` हा कायमस्वरुपी दिसणारा भाव... खरोखर अंमलात आणावेत असे आहेत `त्याचे` आचार. वाटेल त्या गोष्टी `फॉलो` करण्यापेक्षा `त्याला` `फॉलो` केल्यानं अनेक गोष्टी
होतील सुकर. अनेक गुणी कलाकारांनी साकारलेल्या त्या कलानिधीच्या भावमुद्रांपैकी काही
तुमच्यासाठीही... बोला, `गणपती बाप्पा मोरया`...
(छायाचित्रं- विविध
माध्यमांतील कलाकारांकडून साभार.)