Monday, 27 June 2016

मी परतलोय...


मी परतलोय... मी परतलोय...
``असशील तसा, घरी परतून ये. आम्ही रागावणार नाही,`` अशा आशयाची तुमची आर्जवं, विनंत्या माझ्यापर्यंत पोहचल्या अखेरीस. पण त्याला कारणभूत ठरलाय तो तुमच्या डोळ्यांतला भाव. माझी खरोखरच मनापासून तुम्ही पाहिलेली वाट. गावागावातल्या बायाबापड्यांची पाण्यासाठी चाललेली वणवण आणि करपणाऱ्या शेताकडं बघूनही हातपाय न गाळणाऱ्या शेतकऱ्यांची धडपड... जनावरांच्या मुखी चार घास चारा जावा आणि खोलखोल गेलेल्या पाण्याच्या थेंबांसाठी झगडणाऱ्या नि प्रसंगी जीव गमावलेल्या लेकराबाळांसाठी... मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
पण मी मुळीच परतलेलो नाहीये, सोशल मिडियावरच्या कोरड्याठाक उमाळ्यांनी. फोटोंमधलं दुष्काळी दुःख पाहून टाकलेल्या उसाशांनी... फक्त स्वतःचीच उशी भिजवणाऱ्या नि अलंकारांनी वेढलेल्या कवितांमुळं... केवळ पोकळ घोषणाबाजी आणि कागदी घोडे नाचवणाऱ्यांच्या नादाला मी मुळी लागलेलो नाही. शिवाय ते सतत कसला ना कसला इव्हेंट मॅनेज करणारे आणि ``अब वहॉं कैसे हालात हैं``... असे नको तेव्हा, नको ते सवाल करणारे आणि चर्चांची गुऱ्हाळं चालवणाऱ्यांकडं मी ढुंकूनही पाहिलेलं नाहीये... तरीही मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
अस्सल खवय्यांसाठी. माझ्या येण्याच्यानिमित्तानं त्यांच्या खवळलेल्या जिभांचे चोचले पुरवण्यासाठी. तेलकट, मसालेदार, चमचमीत, खमंग, खुसखुशीत, चटकदार आदी विशेषणं त्यांना चाखता यावीत म्हणून. चहा आणि कॉफीवेड्यांना त्यांच्या लाडक्या पेयांची संगत पुन्हा पुन्हा लाभावी म्हणून. समोर चटचट भाजले जाणारे बुट्टे आणि मरीन ड्राईव्हचा किनारा अशी त्या त्या ठिकाणची कॉम्बिनेशन्स पुन्हा पुन्हा व्हावीत म्हणून... मी परतलोय...


 मी परतलोय... मी परतलोय...
पण मी मुळीच परतलेलो नाहीये, भुक्कड सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणाऱ्यांसाठी. किंवा अपंग होणाऱ्यांसाठी. धबधब्यांत भिजताना नको ती हुल्लडबाजी करणाऱ्यांसाठी. रस्त्यावरचा चिखल बाईक किंवा मोटारीनं उडवत पादचाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या धनदांडग्या बाळांसाठी. डोंगरांना पोखरणाऱ्यांसाठी. फांदी पडण्याची भीती दाखवून बहरलेली झाडं अमानुषपणं तोडणाऱ्यांसाठी. रस्त्यांवरचे खड्डे न बुजवणाऱ्यांसाठी आणि तरीही निमुटपणं त्याच रस्त्यांवरून चालणाऱ्यांसाठी... तरीही मी परतलोय...

मी परतलोय... मी परतलोय...
सह्याद्रीच्या कुशीत निर्धास्त तरीही सावधपणाची सावली सोबत बाळगत फिरणाऱ्यांसाठी. डोंगरदऱ्यांना आपलं मानून त्यांत भटकणाऱ्यांसाठी. गडकिल्ल्यांचा इतिहास आठवत वर्तमानात त्यांच्या जतनासाठी झगडत भविष्यासाठी त्यांना जतन करणाऱ्यांसाठी. निसर्गातल्या हिरवाईचा आनंद लुटत आणि त्यात इवल्याशा हातांनी बिया पेरून आणखी भर घालणाऱ्यांसाठी. हे सारे क्षण कॅमेऱ्यांत बंदिस्त करणाऱ्यांसाठी आणि त्यासाठी शब्द, चित्रादी असंख्य माध्यमं वापरून ते सर्वदूर पोहचवणाऱ्यांसाठी... मी परतलोय...


 मी परतलोय... मी परतलोय...
मी आल्याच्या खुशीत गाणं गुणगुणाऱ्यांसाठी. सीडीज ऐकणाऱ्यांसाठी. मैफिली भरवणाऱ्यांसाठी. शब्दांनी माझं स्वागत करणाऱ्यांसाठी. कवितांची संमेलनं भरवणाऱ्यांसाठी. माझ्या गारव्यानं पांघरूणात गुडुप्प होऊन आत्मीयतेनं पुस्तकं वाचणाऱ्यांसाठी. नृत्य-नाट्यादी कलांच्या आविष्कारासाठी... मी परतलोय... हे पाहून अंगणातली तुळस डोलू लागलेय. गाय हंबरतेय. गॅलरीतली सदाफुली तरारलेय. घरात गळती असूनही माणसं हसतमुख आहेत... ते पाहा...ते येताहेत... आज्जी-आजोबा काठी घेऊन... तरीही खंबीरपणं चिखलगाळातून वाट काढत... त्यांचे हात धरून मजेत चालली आहेत, बागडत... आणि आई-बाबा त्या चौघांना आश्वस्त करताहेत मागून चालत की, ``आम्ही आहोत तुमच्यासोबत...`` या कुणास्तव कुणीतरी गायलेल्या अनामिक सुरांनी मीही भारून गेलोय... आणि म्हणूनच मी परतलोय...
आणि हो, पुन्हा रागावून जाणार नाही, याची खबरदारी तुम्ही घ्याल अशी आशा बाळगतोय...
कारण मी परतलोय... मी परतलोय...





(छायाचित्रं – इंटरनेट आणि सोशल मिडियावरून साभार)

Sunday, 12 June 2016

अपडेटेड

आपण होताहोत क्षणाक्षणाला अपडेट
ये हैं अपडेटेड टेक्नॉलॉजी की माया...
कोसळताहेत बातम्यांचे कडे धडाधड
होताहेत फोटो अपलोड पटापट...
ढीगभर अँप्स गिळंकृत करताहेत फोन मेमरी
क्षणार्धात कळतंय कसे आहेत छोरा-छोरी...
समोरच्या माणसाला बुजलेला
प्रत्यक्ष संवादाला कुलुप लावलेला...
सोशल मिडियावर भडाभडा बोलतो
चटाचटा पोस्टून अस्तित्व दर्शवतो...
कधी गाठतो एकटेपणाची गढी
उकरतो आठवणींची मढी...
गळा काढून संस्कृतीच्या नावानं
स्वतः चालतो आपल्याच नादानं...
कधी उचलतो वेदनांची तळी
शांततेआडूनही बंदुकीची गोळी...
कधी चालवतो सर्जनावर तलवार
शब्दांतीत होतात अत्याचार...
जाणीवांचा यक्ष दडवला जातो
शैलीचं झाकण कचकचून आवळतो...
सैरभैर होतं मग मोरपीस
का त्यालाही होतेय लागण?...
कधी कोरड्या दुःखाचा फुटतो पाझर
सामाजिक बांधीलकीचा वाहतो निर्झर...
स्वच्छता, सदाचाराचे फुटतात धुमारे
वाहतात केवळ सेल्फीचेच वारे...
लाईक्स मोजता मोजता
आयुष्य होत राहातंय डिलिट
सतत पोस्टण्याच्या नादात
जगण्याची स्पेस होतेय ट्विट...
जो तो लिहितोय, फोटोतोय
व्हिडिओतोय, रिअॅक्टतोय...
कोटींतले हजारभर राहिलेत का सुजाण?
आहे का त्यांच्या विचारांची जाण?
नाही झालाय ना त्यांच्या संवेदनांचा बाजार
आहे का अजून त्यांच्या माणूसपणाचा आधार...
करो क्लिक, शोधा, सर्चा
लवकर लवकर, येईल मोर्चा...
व्हावं लागेल मग डिसकनेक्ट
कदाचित तेव्हा होऊ खरे अपडेट!!!!



U
PDATE
UPDATE
UPDATE